त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 14:49 IST2025-05-07T14:47:08+5:302025-05-07T14:49:07+5:30
Operation Sindoor : पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सेनेने चांगलाच धडा शिकवला आहे. या ऑपरेशनवर पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी सुबोध पाटील यांनी प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केलं आहे.

त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ दहशतवादी प्रशिक्षण स्थळे नेस्तनाबूत केली आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' आखून केलेल्या या कारवाईचं देशभरातून कौतुक केलं जात आहे. भारतीय सैन्य, हवाई दल आणि नौसेनेने मिळून 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी केलं आहे. पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सेनेने चांगलाच धडा शिकवला आहे. या ऑपरेशनवर पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी सुबोध पाटील यांनी प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केलं आहे.
सुबोध पाटील हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. ते २२ एप्रिल रोजी दुपारी जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा बैसरण व्हॅलीमध्ये उपस्थित होते. देवाच्या कृपेने त्याचा जीव वाचला, पण दहशतवाद्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या २६ लोकांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडल्या होत्या. १४० कोटी भारतीयांप्रमाणे सुबोध पाटील हे देखील या हल्ल्यामुळे संतप्त झाले होते आणि आपले सैन्य पाकिस्तानला कधी प्रत्युत्तर देईल याची वाट पाहत होते. ७ मेच्या मध्यरात्री १.३० नंतर भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केले, यावर सुबोध पाटील यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
Maharashtra : Subodh Patil, a survivor of the Pahalgam terror attack, has expressed satisfaction and Happiness over Indian Army's action under #OperationSindoorpic.twitter.com/GRiS7DLptH
— IANS (@ians_india) May 7, 2025
महिलांना मारलं नाही,पण...
वृत्तसंस्थेशी बोलताना सुबोध पाटील म्हणाले की, "आपल्याला याचा बदला घ्यायचाच होता. हा हल्ला थांबवण्याची हिंमत कोणातही नव्हती. भारत सरकार निश्चितच कारवाई करणार होतं. कारण, दहशतवाद्यांनी त्या दिवशी महिलांना मारलं नाही, पण त्यांचं सौभाग्य हिरावून घेतलं. म्हणून, भारतीय सैन्याने 'सिंदूर' कारवाई केली आणि योग्य तेच केले."
असा बदला घ्या की...
सुबोध पाटील म्हणाले, "आम्हाला सरकारच्या या कारवाईमुळे समाधान वाटत आहे. आम्ही स्वतः तिथे उपस्थित होतो, फक्त देवाच्या कृपेनेच आम्ही वाचलो. आमची एकच विनंती आहे की, सरकार आणि लष्कराने पाकिस्तानविरुद्ध अशी कारवाई करावी की पाकिस्तानन पुन्हा असे कृत्य करायला धजवणार नाही."