Operation Sindoor Railway ticket: रेल्वेच्या आरक्षित तिकिटांवर ऑपरेशन सिंदूरबद्दल जाहिरात छापण्यात आली आहे. याच जाहिरातीबद्दल काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या माध्यम सल्लागाराने आक्षेप घेतला आहे. पीयूष बबेले यांनी तिकिटाचा फोटो शेअर करत भाजपवर टीका केली. 'लष्कराचा पराक्रम एक वस्तू असल्यासारखा विकत आहेत', असे ते म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कमलनाथ यांचे माध्यम सल्लागार असलेल्या पीयूष बबेलेंनी रेल्वे तिकिटाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती लिहिलेली असून, बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो आहे.
ऑपरेशन सिंदूरची रेल्वे तिकिटावर जाहिरात
पीयूष बबेलेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मोदी सरकार कशा पद्धतीने जाहिरातजीवी झाले आहे, याचे हे उदाहरण बघा. रेल्वे तिकिटावर ऑपरेशन सिंदूरचा वापर मोदींच्या जाहिरातीसाठी केला जात आहे. हे लष्कराचा पराक्रमही वस्तू असल्यासारखं विकत आहेत. यांच्याकडून देशभक्ती नाही, तर फक्त सौदेबाजीच होऊ शकते.'
'जेव्हापासून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे दात पाडले, तेव्हापासून भाजपचा हाच प्रयत्न आहे की, सैन्याचा पराक्रम आणि धाडसी जवानांचं शौर्याचा वापर निवडणुकीच्या राजकारणासाठी करता येईल. दुसरीकडे भारतात कायम ही स्वस्थ परंपरा राहिली आहे की, लष्कराचा कोणत्याही प्रकारे राजकारणासाठी वापर केला जात नाही', असे म्हणत पीयूष बबेलेंनी हे बंद करण्याची मागणी केली आहे.
भारतीय रेल्वेने काय म्हटलंय?
पीयूष बबेलेंच्या पोस्टवर भारतीय रेल्वेने खुलासा केला आहे. रेल्वे बोर्डाचे दिलीप कुमार यांनी सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे. संपूर्ण देश जवानांच्या धाडसाचे आणि शौर्याबद्दल अभिमान व्यक्त करत आहे. भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांनाही लष्कराबद्दल गर्व आहे. विविध रेल्वे स्थानकांवर ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रोशनाई करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे तिकिटावरूनही ऑपरेशन सिंदूरचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशात ऑपरेशन सिंदूरचा आनंदोत्सव व्हावा म्हणून हे करण्यात आले आहे.'