"या लोकांना अकबरचा किल्ला माहितीये, पण सरस्वती कूप माहिती नाही"; योगी आदित्यनाथ बरसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:06 IST2025-02-19T16:06:03+5:302025-02-19T16:06:34+5:30
उत्तर प्रदेश विधानसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर हल्ला चढवला. महाकुंभ मेळ्याबद्दल बोलताना आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावले.

"या लोकांना अकबरचा किल्ला माहितीये, पण सरस्वती कूप माहिती नाही"; योगी आदित्यनाथ बरसले
महाकुंभ मेळ्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवरून सरकारच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात असून, योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना उत्तर दिले. ते उत्तर प्रदेश विधानसभेत बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "आपण इथे चर्चा करत असताना कोट्यवधी लोक श्रद्धेने महाकुंभमध्ये स्नान करत आहेत. हे आयोजन कोणत्याही सरकारचे नाहीये, समाजाचे आहे. सरकार फक्त सेवक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. आम्हाला आमच्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे"
"महाकुंभमेळ्याबद्दल अनेक अफवांकडे दुर्लक्ष करून जगभरातून लोक यामध्ये सहभागी झाले आहेत. आमच्या सहवेदना त्या लोकांसोबत आहेत, ज्यांना चेंगराचेंगरीमध्ये प्राण गमवावे लागले आहेत", असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
यात विरोधी पक्षाचे लोक सामील आहेत -योगी
"संगमावरच पाणी स्नान आणि प्राशन करण्यासाठी चांगलं आहे. प्रदूषण नियंत्रण कर्मचारी संगमावर काम करत आहेत. संगमावरील पाण्याबद्दल चुकीचा प्रचार केला जात आहे. यात समाजवादी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षाचे लोक आहे सामील आहेत", असा गंभीर आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला.
अकबरचा किल्ला माहितीये, पण...
समाजवादी पक्षाच्या सोशल मीडिया हॅण्डलवरील भाषेबद्दल योगी आदित्यनाथ म्हणाले, "ही कोणत्याही सभ्य समाजाची भाषा नाहीये. असू शकत नाही. समाजवादी पक्षाच्या नेत्यांना अकबरचे किल्ले माहिती आहेत. पण, त्यांना अक्षयवट आणि सरस्वती कूपाचे महत्त्व माहिती नाही. हे याचं सामान्यज्ञान आहे महाकुंभ आणि प्रयागराजबद्दल", अशी टीका योगींनी केली.