"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:51 IST2025-12-03T20:50:46+5:302025-12-03T20:51:38+5:30
मदनी म्हणाले, "इस्लामबद्दल अफवा पसरवून, लोकांच्या मनात द्वेष भावना निर्माण केली जात आहे. हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे इस्लामला घाबरतात."

"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
जातीयवादी (फिरकापरस्त) शक्तींना इस्लामची भीती वाटते आणि यामुळेच त्या इस्लामला बदनाम करण्यासाठी खोटा प्रचार करत आहेत, असे जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांनी म्हटले आहे. इस्लामला दहशतवादाशी जोडणे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण इस्लाम हा शांती, प्रेम आणि माणुसकीचा संदेश देणारा धर्म आहे, असेही ते म्हणाले.
मदनी म्हणाले, "इस्लामबद्दल अफवा पसरवून, लोकांच्या मनात द्वेष भावना निर्माण केली जात आहे. हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे इस्लामला घाबरतात." एवढेच नाही तर, इस्लामला संपवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शक्ती अपयशी ठरतील, इस्लाम कयामतच्या दिवसापर्यंत टीकेल, असेही ते म्हणाले.
अरशद मदनी पुढे म्हणाले, सर्व लोक आदमची संतती आहेत आणि धर्म (मजहब) नंतर आले. जे लोक इस्लामविरोधी वातावरण निर्माण करत आहेत, त्यांना ना इतिहास समजतो ना देशाबद्दल प्रेम आहे. त्यांनी जनतेला आवाहन केले की, तुम्ही कोठेही राहात असाल, तरी प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश जिवंत ठेवा. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वांनी प्रेमाने आणि सलोख्याने रहायला हवे. धर्माच्या नावावर द्वेष पसरवणाऱ्यांच्या मार्गावर चालणे योग्य नाही आणि अशी विचारसरणी देशासाठी हानिकारक आहे.
'सत्ता कायम नसते' -
जे लोक सत्तेचा उपयोग द्वेष पसरवण्यासाठी करतात, त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, सत्ता कोणाकडेही कायमस्वरूपी राहत नाही, सरकारे येतात-जातात. इस्लाम १४०० वर्षांपासून जिवंत आहे आणि तो कयामतपर्यंत जिवंत राहील, असेही मदनी म्हणाले.