'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:51 IST2025-12-18T12:35:19+5:302025-12-18T12:51:57+5:30
पोलिस चौकशीदरम्यान, आरोपींनी मध्य प्रदेशातील सिहोर आणि महाराष्ट्रातील नागपूर आणि अमरावती येथे असेच गुन्हे केल्याची कबुली दिली.

'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
चोरीच्या घटना आपण अनेक बघितल्या असतील. पण, चोरट्यांनी आता नवीन आयडिया शोधली आहे. मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी एका टोळीला ताब्यात घेतले आहे. या टोळीने मध्ये प्रदेशसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. पोलिस असल्याचे भासवून रस्त्याने जाणाऱ्यांना ही टोळी लुटत होती.
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
१२ नोव्हेंबर रोजी पद्मनगर येथील रहिवासी हसमतराय गुरवानी (६५) यांना लुटण्यात आले. दोन दुचाकीस्वारांनी, हे स्वतःला पोलिस असल्याचे सांगत होते, त्या बनावट पोलिसांनी वयस्कर व्यक्तीला थांबवले आणि म्हणाले, पुढे चोरी झाली आहे. कृपया तुमचे दागिने काढा. यावेळी त्या वृद्धाने त्यांची सोन्याची साखळी आणि अंगठ्या काढून त्या बनावट पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी त्या बनावट पोलिसांनी लगेच पळ काढला.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक मनोज कुमार राय यांनी एक विशेष पथक स्थापन केले. पोलिसांनी शहरातील विविध मार्गांवर बसवलेल्या ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे, संशयितांची ओळख नर्मदापुरम येथील इराणी टोळी म्हणून झाली.
या आधारे, पद्मनगर पोलिसांचे एक पथक नर्मदापुरमला पाठवण्यात आले, तिथे गात्रा उर्फ अप्पा हुसेन उर्फ अयान (२५) आणि कासिम (३०) या दोन आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपींनी त्यांचा साथीदार इक्बाल हुसेन सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरीचा माल त्यांच्या साथीदार इक्बाल हुसेनला दिल्याचेही सांगितले.
महाराष्ट्रातही चोरी
आरोपींनी महाराष्ट्रातील नागपूर आणि अमरावती आणि मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील शाहगंज परिसरात अशाच प्रकारच्या घटना घडल्याची कबुली दिली.
आरोपी पोलिस असल्याचे भासवून पद्धतशीरपणे त्यांचे गुन्हे करत होते. ते एकाकी किंवा वृद्ध पादचाऱ्यांना थांबवत होते आणि अलीकडील गुन्ह्याचा किंवा तपासणीचा उल्लेख करून त्यांचा विश्वास संपादन करत होते. त्यानंतर, सुरक्षा तपासणीच्या बहाण्याने, ते पीडितेला त्यांचे सोन्याचे दागिने काढून ठेवायला सांगायचे.
एकदा त्यांच्याकडे दागिने आले की, आरोपी लगेच मोटारसायकलवरून पळून जात होते. या प्रकरणी खांडवा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जर कोणी पोलिस असल्याचे भासवून तुम्हाला रस्त्यावर थांबवले आणि तुमचे दागिने काढण्यास सांगितले तर त्याच्या जाळ्यात पडू नका. सुरक्षेच्या नावाखाली पोलिस कधीही तुम्हाला दागिने काढून कागदी पेटीत ठेवण्यास भाग पाडत नाहीत. कोणत्याही संशयास्पद हालचालीची त्वरित तक्रार १०० किंवा ११२ वर करा, असंही पोलिसांनी सांगितले आहे.