मोठा खेळ होणार, नितीश कुमारांचा उद्धव ठाकरे करणार? भाजपा नेत्यांच्या दाव्यानंतर बिहारमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 17:06 IST2023-01-02T17:06:07+5:302023-01-02T17:06:56+5:30
Nitish Kumar : भाजपाच्या दोन नेत्यांनी जेडीयूचे मंत्री आणि आमदार आमच्यासोबत आहेत, त्यामुळे लवकरच बिहारमध्ये मोठा राजकीय खेळ होऊ शकतो, असा दावा केल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मोठा खेळ होणार, नितीश कुमारांचा उद्धव ठाकरे करणार? भाजपा नेत्यांच्या दाव्यानंतर बिहारमध्ये खळबळ
पाटणा - नव्या वर्षाला सुरुवात झाली असून, या वर्षात कोणत्या घडामोडी घडती याचा राजकीय वर्तुळातून अंदाज घेण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजपाच्या दोन नेत्यांनी जेडीयूचे मंत्री आणि आमदार आमच्यासोबत आहेत, त्यामुळे लवकरच बिहारमध्ये मोठा राजकीय खेळ होऊ शकतो, असा दावा केल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बघा खरमास (पौष महिना) संपू द्या, त्यानंतर काय काय होतं ते बघत राहा, असा दावा भाजपाच्या दोन नेत्यांनी केला आहे.
बिहारमधील विरोधीपक्ष नेते सम्राट चौधरी यांनी सांगितले की, जनता दल युनायटेडचा पाया हलला आहे. त्यांचा मतदार भाजपाकडे वळला आहे. त्यामुळे जेडीयूचे अनेक नेते त्रस्त आहेत. तसेच काय करावं, हे त्यांना समजत नाही आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर पर्याय म्हणून भाजपा आहे. कारण आमदारकीपासून खासदारकीपर्यंत आरजेडीविरोधातच जिंकून आले होते. आता नितीश कुमार तेजस्वी यादव यांच्याकडे सत्ता सोपवण्याची तयारी करत आहेत. मात्र जेडीयूचे आमदार आणि खासदार यासाठी तयार नाही आहेत. त्यांच्यासमोर भाजपाशिवाय अन्य कुठलाही पर्याय नाही आहे. कारण त्यांच्यासाठी भाजपा मित्रपक्ष राहिलेला आहे. थोडी वाट पाहा लवकरच बिहारमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.
तत्पूर्वी माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते तारकिशोर प्रसाद यांनीही जेडीयूचे अनेक आमदार आणि खासदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. लवकरच जेडीयूमध्ये मोठी फुट पडेल, असे त्यांनी म्हटले होते. तेव्हापासून बिहारमध्ये राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
मात्र भाजपाचे हे दावे जेडीयूने फेटाळले आहे. जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाहा यांनी भाजपावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, भाजपा ज्याच्या हात पकडून बिहारच्या राजकारणात पुढे आला. त्यालाच तोडण्याचा प्रयत्न आज करत आहे. यापेक्षा अधिक हास्यास्पद काय असू शकतं. जेडीयूचा पाया एवढा भक्कम आहे की त्याला तोडणे सोडा कुणी हलवूही शकत नाही. भाजपा नितीश कुमार यांची मोहीम आणि वाढत्या लोकप्रियतेमुळे घाबरली आहे. त्यामुळे आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांमध्ये निर्माण होत असलेल्या भीतीला रोखण्यासाठी अशा प्रकारचे दावे करत आहे.