ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 19:51 IST2025-11-17T19:35:48+5:302025-11-17T19:51:08+5:30
बिहार निवडणुकीत महाआघाडीच्या दारुण पराभव झाला. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी दावा ईव्हीएमवरुन नवीन दावा केला.

ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
बिहार निवडणुकीत आरजेडीसह महाआघाडीचा मोठा पराभव झाला. या निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झाला. निकालानंतर, आरजेडीने सोमवारी पहिली आढावा बैठक घेतली. तेजस्वी यादव यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष लालू यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि खासदार मीसा भारती यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीनंतर, राजदचे माजी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी मोठा दावा केला.'प्रत्येक ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती. तरीही, जर आमचे २५ आमदार जिंकले तर ते भाग्य आहे',असा दावा सिंह यांनी केला.
यावेळी जगदानंद सिंह यांनी विचारले, "तुम्हाला आरजेडीची अशी अवस्था होईल अशी अपेक्षा होती का? पण परिस्थिती बदलण्यासाठी हे उपाय केले गेले. हे देशाचे दुर्दैव आहे. देश कुठे चालला आहे? लोकशाही हा व्यवसाय आहे का? लोक व्यवसायात फसवणूक करतात. लोकशाही ही एक संवैधानिक प्रक्रिया आहे. जेव्हा संविधानाचीच फसवणूक होत असेल, तेव्हा देश टिकेल का?" असा सवाल सिंह यांनी केला.
यावेळी बैठकीला उपस्थित असलेले मानेरचे आमदार भाई वीरेंद्र म्हणाले की, नवनिर्वाचित आमदारांनी तेजस्वी यादव यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. "आम्हाला मिळालेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आम्ही काम करू," असा आरोप त्यांनी केला. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे आणि त्यांच्याविरुद्ध लढा दिला पाहिजे. "आम्ही मतपत्रिकेमुळे निवडणूक जिंकली, पण ईव्हीएममुळे हरलो."