त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:10 IST2025-11-18T15:09:35+5:302025-11-18T15:10:55+5:30
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटातील मुख्य आरोपी उमर उन नबी यांचा सहकारी आमिर राशिद अली याला आता पोलिसांनी अटक केली आहे.

त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले..
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारस्फोटातील मुख्य आरोपी उमर उन नबी यांचा सहकारी आमिर राशिद अली याला आता पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सध्या १० दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान आता त्याच्या सरकारी वकिलांचे वक्तव्य समोर आले आहे. आमिर राशिद अली याला भेटून आल्यानंतर त्याचे वकील म्हणाले की, त्यांनी त्याच्याशी संवाद साधला मात्र या दरम्यान त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप नव्हता. इतकंच नाही तर त्याला पुढे काय होईल याचीही चिंता नव्हती. आपण काय गुन्हा केलाय याची त्याला काही कल्पनाच नव्हती. जणू काही झालंच नाही, अशा अविर्भावात तो होता.
वकील स्मृती चतुर्वेदी म्हणाल्या की, पुढील तपासासाठी एनआयएने आमिर राशिद अलीची कोठडी मागितली आहे. पुढील तपासासाठी त्याची कोठडी मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे. आमिरची चौकशी केली असता, त्याने सांगितले की, लाल किल्ला स्फोटात वापरलेल्या कारचा तो नोंदणीकृत मालक आहे. या सगळ्या चौकशी दरम्यान आमिर राशिद अलीच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते, त्याला स्वतःच्या गुन्ह्याचा पश्चात्ताप देखील होत नव्हता.
एनआयएने सोमवारी दिल्लीतील एका न्यायालयात म्हटले की, १० नोव्हेंबर रोजी शहरातील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील प्रमुख आरोपी आमिर राशिद अली याने दिल्ली स्फोटातील आत्मघातकी बॉम्बर डॉ. उमर उन नबी याला घर आणि इतर मदत पुरवली होती. आमिरच्या कोठडीसाठीच्या अर्जात, एनआयएने म्हटले आहे की, संपूर्ण कट उलगडण्यासाठी आरोपीला कोठडीत घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे.
एनआयएने अर्जात म्हटले आहे की, हल्ल्यात वापरलेल्या कारचा नोंदणीकृत मालक आमिरने उमरला रसद पुरवल्याचा आरोप आहे. स्फोटाच्या आधीच्या दिवसांत आमिरने उमरसाठी एक सुरक्षित घराची व्यवस्था देखील केली होती, असा दावा त्यात करण्यात आला आहे. एजन्सीने अर्जात म्हटले आहे की हे कट जाणूनबुजून जनतेच्या मनात भीती, चिंता आणि दहशत निर्माण करण्यासाठी करण्यात आले होते.
कथित कटाचे गांभीर्य अधोरेखित करताना एनआयएने म्हटले आहे की ही घटना देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका निर्माण करण्याच्या आणि अस्थिर करण्याच्या उद्देशाने होती. पुढील तपासासाठी आमिरला काश्मीरला नेण्यात येईल, असेही एजन्सीने न्यायालयाला सांगितले.