युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 03:12 IST2025-05-13T03:10:07+5:302025-05-13T03:12:26+5:30
दाेन्ही देशांकडे असलेले अणुबाॅम्ब आणि त्याचा संभाव्य परिणाम पाहता झालेला निर्णय दाेन्ही देशाच्या दृष्टीने चांगला आहे.

युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
डाॅ. हर्षद भाेसले, अभ्यासक, आंतरराष्ट्रीय संबंध
भारत-पाकिस्तानमध्ये आताची तणावाची स्थिती ही १९९०नंतरच्या स्थितीशी तुलना करता अधिक भीषण आहे. मुळात यावेळी युद्ध झालेलेच नाही, पण चित्र असे निर्माण केले गेले की, भारत - पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष युद्धच सुरू झालेले आहे. पहलगाम घटनेनंतर निर्माण झालेली तणावाची स्थिती आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न दाेन्ही देशांनी केला आहे.
युद्ध थांबले, याचे श्रेय भारत - पाकिस्तान या दाेन्ही देशातील राजनैतिक प्रयत्नांना द्यावे लागेल. यात अमेरिकेचा काहीएक संबंध नाही. आजच्या तणावपूर्ण स्थितीचा संबंध जर आपण आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण याच्याशी लावला तर युद्ध झाल्यास फार माेठ्या परिणामाला सामोरे जावे लागेल. हे दाेन्ही देशांनी ओळखल्यामुळे कदाचित तणाव कमी करायचे ठरवले. यालाच आपल्याकडे शस्त्रसंधी समजली गेली.
माझ्या मते ही शस्त्रसंधी नसून, डीएस्केलेशन आहे. संघर्षमयी वातावरण स्वत: हाेऊन कमी करण्याचे दाेन्ही देशांच्या धुरिणांनी मान्य केलेले आहे. युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधी हाेण्याचा प्रश्नच येत नाही. येणाऱ्या काळातील राजकीय अर्थकारणाचा विचार करून हा निर्णय झालेला दिसताे. दाेन्ही देशांकडे असलेले अणुबाॅम्ब आणि त्याचा संभाव्य परिणाम पाहता झालेला निर्णय दाेन्ही देशाच्या दृष्टीने चांगला आहे.