‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:17 IST2025-07-10T17:16:39+5:302025-07-10T17:17:09+5:30
Uttar Pradesh News: गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या विविध राज्यातील नेत्यांची विधाने आणि कृती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्यामुळे पक्षावर सातत्याने नामुष्की ओढवत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ऊर्जामंत्री ए.के. शर्मा यांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले
गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या विविध राज्यातील नेत्यांची विधाने आणि कृती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्यामुळे पक्षावर सातत्याने नामुष्की ओढवत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ऊर्जामंत्री ए.के. शर्मा यांचा असाच एक व्हिडीओ समोर आला असून, या व्हिडीओमुळे ते चांगलेच अडचणीत आले आहे. या व्हिडीओमध्ये काही ग्रामस्थ त्यांच्यासमोर विजेची समस्या मांडताना दिसत आहेत. मात्र ग्रामस्थांची समस्या ऐकल्यावर मंत्रिमहोदय हात जोडून उभे राहत जय श्री राम, जय हनुमान अशा घोषणा देत जयजयकार करत निघून जातात, असं दृश्य चित्रित झालं आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे ऊर्जा मंत्री ए. के. शर्मा हे सुल्तानपूर जिल्ह्यातून जात होते. तेव्हा त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला व्यापाऱ्यांच्या एका समुहाने स्वागत करण्यासाठी थांबवले. मंत्रिमहोदय त्यांच्या कारमधून उतरले तेव्हा व्यापारी आणि सर्वसामान्य लोकांनी त्यांनी फुलांच्या माळा घालून त्यांचे स्वागत केले. एवढं जंगी स्वागत पाहून मंत्रिमहोदयही भारावून गेले. याचदरम्यान, काही व्यापाऱ्यांनी त्या भागात असलेल्या विजेच्या अनियमित पुरवठ्याबाबतची समस्या मंत्रिमहोदयांसमोर मांडली. तसेच आपल्या मागण्या असलेलं एक पत्रकही त्यांना दिलं.
साहेब, आमच्याकडे वीज येत नाही. २४ तासांपैकी केवळ ३ तासच वीज येते. अधिकारीही ऐकून घेत नाहीत, आता तुम्हीच काही तरी करा, अशी विनंती उपस्थितांपैकी काही ग्रामस्थांनी मंत्र्यांकडे केली. त्यावर मंत्रिमहोदयांनी दोन्ही हात जोडून वीजप्रश्नामध्ये लक्ष घालतो, पाहूया सअशे सांगितले. त्यानंतर जय श्री राम, जय श्रीराम, जय हनुमान अशा घोषणा देत ते पुढे रवाना झाले. तसेच उपस्थित लोकही त्यांच्यामागून घोषणा देऊ लागले. त्यामुळे आता ग्रामस्थांच्या विजेच्या समस्येचं निराकरण कसं काय होतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.