...तर या राज्यात झाली असती भाजपा आणि काँग्रेसची आघाडी, असा लागला प्रयत्नांना ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 21:26 IST2024-12-25T21:26:24+5:302024-12-25T21:26:40+5:30
Punjab Politics News: पंजाबमध्ये एका महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये आघाडी करण्याचा घाट स्थानिक नेत्यांनी घातला होता. मात्र याची कुणकुण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना लागल्यानंतर सदर प्रयत्न थांबवण्यात आले.

...तर या राज्यात झाली असती भाजपा आणि काँग्रेसची आघाडी, असा लागला प्रयत्नांना ब्रेक
मागच्या काही वर्षांपासून देशाच्या राजकारणात आघाडी, युतीच्या समीकरणांची अनेकदा मांडणी झालेली आहेत. त्यामधून अनेक पक्षांनी कधी ना कधी परस्परांशी आघाडी आणि युती केली आहे. अगदी महाराष्ट्रातही शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले होते. मात्र देशाच्या राजकारणात एकमेकांचे परंपरागत विरोधी पक्ष असलेले काँग्रेस आणि भाजपा यांनी मात्र कधी एकत्र येऊन आघाडी किंवा युती केलेली नाही. मात्र पंजाबमध्ये एका महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये आघाडी करण्याचा घाट स्थानिक नेत्यांनी घातला होता. मात्र याची कुणकुण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना लागल्यानंतर सदर प्रयत्न थांबवण्यात आले.
पंजाबमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असून, त्यापैकी लुधियाना महानगरपालिकेमध्ये ९५ पैकी४३ जागा जिंकून आप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेसला ३० आणि भाजपा १९ जागांसह बऱ्यापैकी यश मिळालं आहे. मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. आम आदमी पक्षाला ४८ हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ५ नगसेवक कमी पडत आहेत. तर काँग्रेस आणि भाजपाच्या नगरसेवकांची संख्या ही ४९ होते. त्यामुळे आम आदमी पक्षाला रोखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांनी या आघाडीची शक्यता चाचपून पाहिली. मात्र याची खबर भाजपाचे पंजाब प्रभारी विजय रुपाणी यांना लागताच त्यांनी हे प्रयत्न हाणून पाडले.
दरम्यान, भाजपाचे पंजाबमधील नेते आणि केंद्रीय मंत्री रवनीतसिंग बिट्टू यांनी काँग्रेस आणि भाजपामध्ये आघाडी होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे बिट्टू यांनी स्पष्ट केले आहे.