चेष्टेत थेट जीव गेला; बायकोसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना घडलं विपरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 18:02 IST2024-03-05T18:00:32+5:302024-03-05T18:02:55+5:30
तरुणाला गळफास बसताच त्याच्या हातात असलेला मोबाईल खाली पडला.

चेष्टेत थेट जीव गेला; बायकोसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना घडलं विपरीत
बांदा : दारूच्या नशेत बुडालेल्या एका तरुणाने आपल्या पत्नीला घाबरवण्यासाठी व्हिडिओ कॉल करून गळ्यात दोर अडकवत गळफास घेण्याची धमकी दिली. केवळ घाबरवण्यासाठी मस्करीत गळफास लावत असताना नंतर खरोखरच दोरीचा फास बसला आणि तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांदा इथं घडली आहे. तरुणाला गळफास बसताच त्याच्या हातात असलेला मोबाईल खाली पडला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अनिल वर्मा हा ३२ वर्षीय तरुण खपटिहा या गावातील रहिवाशी होता. तो मागील तीन ते चार वर्षांपासून हरियाणा येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वी तो आपल्या गावात आला होता. सोमवारी रात्री साधारण १० वाजताच्या सुमारास त्याने पत्नीला व्हिडिओ कॉल केला आणि गळ्यात दोरी टाकून गळफास घेण्याची धमकी देऊ लागला. अनिल हा दारूच्या नशेत असल्याचं लक्षात आल्याने पत्नीला त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही अनिल हा वारंवार दोर घट्ट आवळण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर अचानक दोरीचा फास बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकाराबाबत कळताच अनिलचा लहान भाऊ विमल याने अनिलच्या खोलीकडे धाव घेतली. मात्र त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. भावाचा जीव वाचवण्यासाठी विमलने तात्काळ दरवाजा तोडला. त्यावेळी अनिल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. विमलने त्याला तातडीने खाली उतरवलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अनिलने जागीच प्राण सोडले होते.
दरम्यान, या घटनेनं अनिलच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधिकारी संदीप पटेल यांनी अनिलचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे.