राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:23 IST2025-11-06T10:22:21+5:302025-11-06T10:23:03+5:30
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, भाजपाने मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी केल्याचा दावा करत, पुरावा म्हणून एक मतदार ओळखपत्र देखील दाखवले होते. हे ओळखपत्र दाखवत, या ओळखपत्रावर ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून अनेकवेळा मतदान करण्यात आले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी बुधवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीत “मतदान चोरी” झाल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, भाजपाने मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी केल्याचा दावा करत, पुरावा म्हणून एक मतदार ओळखपत्र देखील दाखवले होते. हे ओळखपत्र दाखवत, या ओळखपत्रावर ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून अनेकवेळा मतदान करण्यात आले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.
मात्र, राहुल गांधी यांच्या या दाव्यानंतर वेगळेच चित्र समोर येत आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी ज्या महिलेचे मतदार ओळखपत्र दाखवून मतचोरीचा आरोप केला, आता खुद्द त्या महिलेनेच यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. या महिलेचे नाव 'पिंकी' असे आहे. त्या म्हणाल्या, “मी स्वतः मतदान केले आहे, कसलीही मतचोरी झालेली नाही.” पिंकी यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या मतदार ओळखपत्रावर फोटो चुकीचा छापला गेला होता. मी जेव्हा पहिल्यांदा ओळखपत्र बनवण्यासाठी अर्ज केला, तेव्हा त्यावर चुकीचा फोटो आला होता. तो आमच्या गावातील एका दुसऱ्या महिलेचा होता. मी ते ओळखपत्र लगेच परत केले, पण अद्याप सुधारित कार्ड मिळाले नाही. तसेच, "आपण 2024 च्या निवडणुकीत मतदार स्लिप आणि आधार कार्ड वापरून मतदान केले.” असे पिंकी यांनी स्पष्ट केले.
पिंकी यांच्या या खुलाशानंतर आता राहुल गांधी यांच्या आरोपांवर प्रश्नचिंन्ह निर्माण झाले आहे. यावर आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, हे बघण्यासारखे असेल. दरम्यान, भाजपानेही बुधवारी राहुल गांधींचे देवे खोटे आणि निराधार असल्याचे म्हणत, ते स्वतःचे राजकीय अपयश झाकण्यासाठी आणि देशाच्या लोकशाही संस्थांना बदनाम करण्यासाठी निवडणूक आयोगावर खोटे आरोप करत असल्याचे म्हटले होते.”