उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील कोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक गावातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लग्न झाल्यानंतर शनिवारी सकाळी पाठवणीपूर्वीच नवरदेव किन्नर असल्याचे समोर आले आणि एकच गोंधळ उडाला. ही माहिती मिळताच बहुतांश वऱ्हाडी आणि नवरदेवाकडील लोकांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, संतप्त मुलीकडील मंडळींनी नवरदेव आणि त्याच्या आईला पकडून ठेवले.
यासंर्भात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचा विवाह दिलौना येथील रहिवासी बालचंद यांचा मुलगा रिशु याच्यासोबत निश्चित झाला होता. दोन महिन्यांपूर्वी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला, यानंतर १३ फेब्रुवारी ही लग्नाची तारीख काढण्यात आली. ठरल्याप्रमाणे वऱ्हाड आले आणि रात्रीच लग्नाचे सर्व विधी पार पडले. यानतंर, शनिवारी सकाळी पाठवणीपूर्वी, काही किन्नर अचानक लग्नाच्या ठिकाणी आले आणि नवरदेव आपल्या समुदायाचा असल्याचे म्हणत त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले. हे संपूर्ण प्रकारपाहून मुलीकडच्या मंडळींच्या पाया खालची वाळूच सरकली.
सत्य समोर येताच वऱ्हाडी मंडळींनी तेथून काढता पाय घ्यायला सुरुवात केली. मुलीच्या नातेवाईकांनी ग्रामप्रधानांच्या माध्यमाने मुलाच्या कुटुंबीयांना बोलावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आलेच नाही. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना बोलावण्यात आले.
यानंतर, पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचायत भरवून दोन्ही कुटुंबाचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. उशिरा संध्याकाळी नवरदेवाचे मामा तिथे पोहोचले आणि दोन्ही पक्षांच्या परस्पर संमतीने हा वाद मिटवण्यात आला आणि वऱ्हाडी नवरीशिवाय परतले.
कोठी पोलीस ठाण्याचे प्रभारी अमित सिंह भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, " घटनेची माहिती मिळताच, दोन्ही पक्षांना बोलावून त्यांच्यात सामोपचाराने तडजोड घडवून आणण्यात आली."