Rajya Sabha: लोकसभेतील गदारोळाचे राज्यसभेत पडसाद, विरोधकांचा सभात्याग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:37 IST2026-02-06T13:35:54+5:302026-02-06T13:37:41+5:30

Rajya Sabha News: माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातील उतारे वाचण्यास मल्लिकार्जुन खरगे यांनाही रोखले

The uproar in the Lok Sabha reverberated in the Rajya Sabha, opposition members walked out of the House! | Rajya Sabha: लोकसभेतील गदारोळाचे राज्यसभेत पडसाद, विरोधकांचा सभात्याग!

Rajya Sabha: लोकसभेतील गदारोळाचे राज्यसभेत पडसाद, विरोधकांचा सभात्याग!

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले नाही, असा आक्षेप घेत राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गुरुवारी सभात्याग केला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांचा मुद्दा सभागृहात लावून धरला. तसेच खरगे यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील चीन-भारतबाबतचे उतारे वाचण्यास सुरुवात केली असता त्यांना सभापतींनी रोखले. त्या निर्णयाचाही विरोधकांनी जोरदार निषेध केला. 

शून्य प्रहरात खरगे यांनी राहुल गांधी यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले की, लोकसभेतील कामकाजावर राज्यसभेत चर्चा होऊ शकत नाही. जर राहुल गांधी यांच्या विषयात काँग्रेस पक्षाला स्वारस्य असेल, तर त्यांच्या नेत्यांनी लोकसभेतील काँग्रेसच्या खासदारांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मांडण्यात आलेल्या आभारप्रदर्शन प्रस्तावाच्या चर्चेत सहभागी होण्याचा सल्ला द्यावा. 

संसदेची दोन्ही सभागृहे अतिशय महत्त्वाची: खरगे

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत सांगितले की,  राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन प्रस्तावावर तीन दिवस झालेल्या चर्चेनंतर आता काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांचा मुद्दा उपस्थित करतात हे आश्चर्यकारक आहे. राज्यसभेतील पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यास सर्वजण उत्सुक आहेत. काँग्रेसला हे भाषण ऐकायचे नसल्यास ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांच्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही. त्यावर खरगे म्हणाले की, संसद दोन सभागृहांनी बनलेली आहे. ती केवळ एकाच सभागृहावर अवलंबून नाही. दोन्ही सभागृहे लोकशाहीचे स्तंभ आहेत, पण सरकार स्वत:चे अपयश लपविण्यासाठी एका स्तंभाचे खच्चीकरण करत आहे.

पंतप्रधानांच्या भाषणप्रसंगी विरोधकांकडून सरकारच्या निषेधाच्या घोषणा

- राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत मांडण्यात आलेल्या आभारप्रदर्शन प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी राज्यसभेत भाषण करत असताना विरोधी खासदारांनी सरकारविरोधात घोषणा दिला व सभात्याग केला. 

- पंतप्रधान राज्यसभेत आपले भाषण करण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी त्या सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली. सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी मात्र तशी परवानगी दिली नाही आणि पंतप्रधानांनी आपले भाषण सुरू केले. 

- लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाषण पूर्ण करण्यास परवानगी न दिल्याबद्दल राज्यसभेत विरोधी खासदार घोषणाबाजी करत होते. त्यानंतर त्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला व संसद भवनाच्या मकरद्वारातून घोषणा देत ते बाहेर पडले.

Web Title: The uproar in the Lok Sabha reverberated in the Rajya Sabha, opposition members walked out of the House!