खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:29 IST2025-07-05T12:29:06+5:302025-07-05T12:29:39+5:30
Sushil Kedia News: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्यास भाग पाडल्यानंतर आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा मुंबईत होत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत.

खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्यास भाग पाडल्यानंतर आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा मुंबईत होत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. दरम्यान, या सभेला सुरुवात होण्यापूर्वी मराठीत बोलणार नाही, काय करायचं ते करा, अशी धमकी देणाऱ्या सुशील केडिया यांना मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी दणका दिला आहे. महाराष्ट्रसैनिकांनी मुंबईमधील केडिया यांचं कार्यालय फोडलं.
मराठी आणि हिंदी असा वाद पेटल्यानंतर मीरारोड येथे एका परप्रांतीय दुकानदाराला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर सुशील केडिया यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहून राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. त्यात ते म्हणाले की, मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता, तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, मी मराठी शिकणार नाही. मी अशी प्रतिज्ञा करतो. क्या करना है बोल? असं आव्हान त्यांनी दिलं होतं. त्यावरून वादाल तोंड फुटलं होतं.
मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी देणं उद्योजक सुशील केडिया यांना चांगलंच महागात पडलं आहे. कार्यकर्त्यांनी मुंबईमधील केडिया यांच्या ऑफिसची तोडफोड केली. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या ऑफिसवर दगड आणि नारळ फेकले. केडियांच्या ऑफिसबाहेर त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.