फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या जिभेवर कोल्हापुरातील ठिकपुर्लीच्या बर्फीचा गोडवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:22 IST2026-02-20T12:21:03+5:302026-02-20T12:22:42+5:30
जिल्हा प्रशासनाने पाठवली दहा किलो बर्फी

संग्रहित छाया
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील ऐतिहासिक भेटीदरम्यान गुरुवारी मॅक्रॉन यांच्या जिभेवर कोल्हापुरातील ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील अस्सल दुधाच्या गोड बर्फीची चव रेंगाळली. कोणत्याही कृत्रिम रंगाचा वापर न करता तयार झालेल्या या पारंपरिक बर्फीने तपासण्यांचे कडक टप्पे पार केल्यानंतर परदेशी पाहुण्यांना व त्यांच्या शिष्टमंडळाला तृप्त केले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन हे सध्या भारत दौऱ्यावर असून मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी लोक भवनच्या वतीने भारतभरातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थाची ऑर्डर देण्यात आली होती. अधिकाऱ्यांना कोल्हापुरातील प्रसिद्ध ठिकपुर्लीची बर्फी माहिती होती, त्यानुसार त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे बर्फी पाठविण्यास सांगितले.
प्रशासनाने ठिकपुर्लीतून दहा किलो बर्फी बनवून घेतली व रविवारी मुंबईला रवाना केली. मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने बर्फीची तपासणी केल्यानंतर फ्रान्सच्या अध्यक्षांच्या गुरुवारच्या मेजवानीत त्याचा समावेश करण्यात आला. कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील या पदार्थाचा गोडवा जागतिक नेत्यांच्या ताटापर्यंत पोहोचल्याने येथील सांस्कृतिक आणि कृषी वारशाचा गौरव झाला आहे.
समोर बसून बनवून घेतली...
बर्फीची मागणी येताच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वत: यात जातीने लक्ष घालून राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोर ती बनवून घेण्यास सांगितली. तलाठी जे. एम. शिंदे यांनी पारंपरिक बर्फी व्यावसायिक संदीप ढेंगे यांच्याकडून ती बनवून घेतली. बर्फीमध्ये कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह घातले जात नाहीत. फक्त दूध आटवून त्यात साखर घातली जाते व त्याच्या वड्या पाडल्या जातात. तलाठ्यांसमोर ही बर्फी बनवून त्याचे पॅकिंग करण्यात आले. ते स्वत: बर्फी देण्यासाठी मुंबईला गेले होते. या प्रक्रियेत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी समन्वयाचे काम केले.