निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यसभेच्या ८ जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या. या जागांवर होणाऱ्या निवडणुकांमुळे विरोधी I.N.D.I.A. अलायन्सची ताकद दोन जागांनी वाढू शकते. १९ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत तामिळनाडूच्या ६ जागांसाठी मतदान होणार आहे तर आसामच्या दोन जागांसाठी मतदान होईल. राज्यसभा सदस्यांच्या निवृत्तीमुळे या जागा रिक्त होत आहेत. तामिळनाडूतील सहा सदस्य जुलै महिन्यात निवृत्त होत आहेत. तर आसाममधील दोन सदस्यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपत आहे. तामिळनाडूतील ज्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत, त्यापैकी तीन जागा आतापर्यंत द्रमुक सदस्यांकडे होत्या. याशिवाय, पीएमके, एआयएडीएमके आणि एमडीएमकेकडे तीन जागा होत्या.
तामिळनाडू विधानसभेतील सध्याच्या समीकरणानुसार, द्रमुकच्या जागा ३ वरून ४ वर पोहोचू शकतात. याशिवाय, काँग्रेसशी सहमती झाल्यास द्रमुक त्यांना एक जागा देऊ शकते. असे झाले तरी, एक जागा विरोधी इंडिया अलायन्सच्याच खात्यात जाईल. याशिवाय, आसामचे गणित पाहता, विरोधी पक्षाच्या जागांत एका जागेची भर पडू शकते. सध्या निवृत्त होणारे सदस्य भाजप आणि आसाम गण परिषदेचे सदस्य आहेत. मात्र, विधानसभेच्या समीकरणानुसार, निवडणुकीच्या बाबतीत, एक जागा भाजपला जाईल तर दुसरी जागा काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रपक्षाला जाऊ शकते.
अशाप्रकारे, निवयेडणुकीनंतर, राज्यसभेतील विरोधी पक्षांची संख्या ९१ वर पोहोचू शकते. जी सध्या ८९ आहे. याशिवाय, एनडीएच्या जागांची संख्या १२८ वरून १२६ पर्यंत कमी होऊ शकते.
हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांतील निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विरोधकांसाठी ही एक दिलासादायक गोष्ट असेल. खरे तर, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकीत सतत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. यांत झारखंड अपवाद ठरतो. येथे झामुमोच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीचे सरकार आले आहे. या आघाडीत काँग्रेसचाही समावेश आहे.