पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 08:00 IST2025-05-19T07:59:18+5:302025-05-19T08:00:16+5:30
श्रीनगरचे टूर ऑपरेटर मुश्ताक अहमद डार सांगतात, आधीच्या बुकिंग रद्द झाल्यानंतर केवळ १० टक्के बुकिंग आमच्याकडे उरले होते. अलीकडच्या सीमावर्ती तणावामुळे तेही शून्यावर आले आहे.

पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
सुरेश एस डुग्गर -
जम्मू : नियंत्रण रेषेवर (एलओसी) निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे काश्मीरमधील पर्यटन क्षेत्र पुन्हा एकदा गंभीर संकटात सापडले आहे. पर्यटन उद्योगातील लोकांच्या मते, ९० टक्के पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्याने पर्यटनावर उपजीविका भागवणाऱ्या स्थानिकांना जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. श्रीनगरचे टूर ऑपरेटर मुश्ताक अहमद डार सांगतात, आधीच्या बुकिंग रद्द झाल्यानंतर केवळ १० टक्के बुकिंग आमच्याकडे उरले होते. अलीकडच्या सीमावर्ती तणावामुळे तेही शून्यावर आले आहे.
बैसरन हल्ल्याच्या धक्क्यातून सावरत असतानाच पुन्हा संकटात सापडलो आहोत. काश्मीरचा पर्यटन उद्योग राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७-८ टक्के थेट योगदान देतो. पर्यटकांची संख्या रोडावल्याने उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याच कारणामुळे काही व्यावसायिक पर्यायी उत्पन्नाच्या शोधात इतरत्र स्थलांतर करत आहेत. हॉटेल व्यवसायक बिलाल हुसैन अमृतसरला गेले आहेत.
पुरवठा साखळी विस्कळीत
बैसरनमधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात अस्वस्थता निर्माण झाली असून, त्याचा प्रभाव अजूनही पर्यटन क्षेत्रावर जाणवत आहे, असे स्थानिक उद्योगजक सांगतात.
दल सरोवरातील हाउसबोट मालक शबनम भट यांच्यानुसार, बैसरन घटनेचा मोठा परिणाम अंतर्गत व्यवसाय व वाहतूक मार्गांवर झाला आहे. त्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. आम्ही आशा ठेवून होतो, पण सीमेवरील तणावाने तीही उद्ध्वस्त केली.
पंतप्रधान मोदींना साकडे
हॉटेल चालक, गाईड्स, शिकारा चालक आणि हाउसबोट मालक या सर्वांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे की, त्यांनी पुढाकार घेऊन पर्यटकांना पुन्हा काश्मीरकडे आकर्षित करण्यासाठी मार्ग काढावा.