अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 05:35 IST2025-11-25T05:34:39+5:302025-11-25T05:35:17+5:30
Ram Mandir Ayodhya: उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीमध्ये सध्या उत्सवाचे वातावरण आहे. येथे उभारलेल्या राममंदिराच्या शिखरावर उद्या, मंगळवारी केशरी ध्वज फडकणार आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले याचे हे निदर्शक असणार आहे.

अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
अयोध्या - उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीमध्ये सध्या उत्सवाचे वातावरण आहे. येथे उभारलेल्या राममंदिराच्या शिखरावर उद्या, मंगळवारी केशरी ध्वज फडकणार आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले याचे हे निदर्शक असणार आहे. यासाठी रामनगरीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या पाच दिवसांच्या धार्मिक अनुष्ठानादरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
शुक्ल पक्ष पंचमीचा मुहूर्त का?
ध्वजारोहणाचा कार्यक्रम मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमीला होत आहे. त्याच दिवशी भगवान राम व सीतामाईच्या विवाह पंचमीचा मुहूर्तही असून तो दिव्य संयोगाचे प्रतीक मानला जातो. तसेच या दिवशी शीख गुरू तेग बहादूर यांचा हुतात्मा दिनही आहे. त्यांनी १७व्या शतकात अयोध्येत ४८ तास ध्यान केले होते असे सांगण्यात येते.
ध्वजारोहण सोहळ्यासाठी आमंत्रित ८ हजार अतिथींसाठी आसनव्यवस्था लावण्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रचे महासचिव चंपतराय यांनी दिली.
पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत उद्या दुपारी १२ वाजता राममंदिराच्या शिखरावर केशरी ध्वज फडकवतील.
त्याआधी ते अयोध्येत सप्तमंदिर, शेषावतार मंदिर,
माता अन्नपूर्णा मंदिर येथे दर्शन व पूजा करतील. यानंतर ते राम दरबार गर्भगृह आणि रामलल्ला गर्भगृहात दर्शन घेतील.
मोदी यांच्या अयोध्या भेटीच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यक्रमस्थळी सर्व व्यवस्थेची पाहणी केली. अयोध्येतील प्रत्येक चौक-चौकावर पोलिसांची गस्त सुरू असून सर्वत्र कसून तपासणी सुरू आहे.
केशरी ध्वज आहे तरी कसा?
राममंदिराच्या शिखरावर फडकणारा केशरी ध्वज हा त्रिकोणाकृती असून, तो १० फूट उंच व २० फूट लांब आहे. त्यावर भगवान रामाच्या तेज व शौर्याचे प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्याचे चित्र तसेच ‘ॐ’ आणि कोविदार वृक्षाची प्रतिमाही असणार आहे. हा ध्वज ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरा तसेच आदर्श रामराज्य यांचे प्रतीक आहे.
विशेष सुरक्षा युनिट्स : एटीएस कमांडोच्या एकूण २ पथके,एनएसजी स्नायपर्सच्या एकूण २ पथके, ड्रोनविरोधी युनिट्सची एकूण १ पथके