असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 05:42 IST2025-11-26T05:41:38+5:302025-11-26T05:42:34+5:30
अयाेध्येत राम मंदिरावर फडकला भगवा

असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अयोध्या : शतकानुशतके असलेले घाव व वेदना आता भरून निघाल्या आहेत. अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या ५०० वर्षांपूर्वी केलेल्या संकल्पाची पूर्तता झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. राममंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकविल्यानंतर मोदी यांनी हे वक्तव्य केले. या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हा समारंभ आयोजिण्यात आला होता.
मोदी यांनी सांगितले की, अयोध्या आणखी एका ऐतिहासिक घटनेची साक्षीदार बनली असून, संपूर्ण देश, जग हे राममय झाले आहे. सत्य कायम असत्यावर विजय मिळविते याचा भगवा ध्वज हे प्रतीक आहे. रामजन्मभूमीवर भव्य राममंदिर उभारण्यात योगदान देणाऱ्यांचे मोदी यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की भगवान राम यांनी कधीही कोणाशीही भेदभाव केला नाही. आपण सर्वांनी याच भावनेचा अंगीकार केला पाहिजे. आपला देश प्रगती साधत असताना सर्वांनी सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगला पाहिजे.
असा आहे मंदिरावरील ध्वज...
राममंदिराच्या शिखरावर फडकाविण्यात आलेला ध्वज पॅराशूट ग्रेड कापडाचा बनलेला असून, जाड नायलॉनच्या दोरीने १६१ फूट उंच शिखरावर तो फडकविण्यात आला आहे. या ध्वजावर सूर्यवंशाचे प्रतीक सूर्य, ओमचिन्ह व कोविदार वृक्षाची प्रतिके आहेत. कोविदार वृक्षाला रामराज्याचा राज्यवृक्ष मानले जाते.
अयोध्या के पावन धाम में श्री राम जन्मभूमि मंदिर में ध्वजारोहण समारोह का हिस्सा बनना मेरे लिए अत्यंत भावविभोर करने वाला अनुभव रहा। शुभ मुहूर्त में संपन्न हुआ यह अनुष्ठान हमारे सांस्कृतिक गौरव और राष्ट्रीय एकता के नए अध्याय का उद्घोष है। राम मंदिर का गौरवशाली ध्वज, विकसित भारत के… pic.twitter.com/1uwYN2NXHW
— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2025
गुलामगिरी मानसिकता त्यागा
प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगण्याची व गुलामगिरीच्या मानसिकेतून मुक्त होण्याची आवश्यकता आहे. पिढ्यानपिढ्या जो न्यूनगंड तयार झाला आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी येत्या दहा वर्षांत सर्वांनी निकराचे प्रयत्न केले पाहिजेत. मेकॉले याच्या वारशाचा प्रभाव स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही देशात टिकून राहिला आहे. त्या मानसिकतेचा भारताने प्रगती साध्य करण्यासाठी त्याग केला पाहिजे. लोकशाही संकल्पना विदेशातून आली हा गैरसमज आहे. भारत हा लोकशाहीचा जन्मदाता आहे. ही व्यवस्था आपल्या डीएनएमध्ये आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.