पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय संरक्षण दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाला तोंड फुटले होते. हा संघर्ष १० मे २०२५ रोजी झालेल्या युद्धविरामानंतर थांबला होता. त्याला आज तीन महिने पूर्ण झाले आहेत. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरबाबत मात्र दररोज नवनवे दावे केले जात आहेत. त्यात हवाई दल प्रमुखांनी काल ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं आणि एक टेहळणी विमान पाडल्याचे पुराव्यानिशी सांगितले होते. त्यानंतर आता लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनीही आज मोठं विधान केलं आहे. आपण ज्याचा विचार करत आहोत ते पुढचं युद्ध लवकरच होऊ शकतं. तसेच आपल्याला त्यानुसार तयारी करावी लागेल. यावेळी आपल्याला मिळून लढाई लढावी लागेल, असे उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले आहे.
आयआयटी मद्रास येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमाला संबोधित करताना जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये जे काही घडलं त्याने संपूर्ण देश हादरला होता. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतीय सैन्य दलांना कारवाईची खुली सूट देण्यात आली होती. जी कारवाई करायची ती तुम्ही निश्चित करा, असे सांगण्यात आले होते. हे राजकीय दिशा आणि स्पष्टतेचं असं उदाहरण होतं, जे आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो.
जनरल द्विवेदी म्हणाले की, पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी आमची बैठक झाली तेव्हा आता खूप झालं, असं संरक्षण मंत्री म्हणाले. तर मोठी कारवाई केली पाहिजे यावर तिन्ही दलांच्या प्रमुखांचं एकमत झालं होतं.
उपेंद्र द्विवेदी यांनी पुढे सांगितले की, २५ एप्रिल रोजी आम्ही उत्तर कमांडवर गेलो. तिथे आम्ही विचार करून एक योजना आखली. तसेच तिची अंमलबजावणी करण्याची पूर्वतयारी केली. नंतर राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही दहशतवाद्यांचे नऊ पैकी ७ अड्डे नष्ट केले. तसेच दहशतवाद्यांचाही मोठ्या प्रमाणावर खात्मा करण्यात यश मिळवले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे खेळत होतो. शत्रूची पुढची चाल काय असेल आणि त्यावर आम्ही काय चाल खेळणार हे आम्हाला माहिती नव्हते. याला ग्रे झोन असं म्हणतात. याचा अर्थ आम्ही पारंपरिक युद्ध लढत नव्हतो. तर आम्ही आधी सांगितलेली रणनीती अवलंबली होती. आम्ही एखादी चाल खेळायचो. मग शत्रूही एखादी चाल खेळायचा. कधी आम्ही त्याला चेकमेट करत होतो. तर कधी जीव धोक्यात घालून वार करत होतो. जीवन यालाच म्हणतात, असेही त्यांनी सांगितले.