३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:04 IST2025-10-14T19:03:09+5:302025-10-14T19:04:54+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील इंदिरापुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील सारा गोल्ड सोसायटीमध्ये राहणाऱ्या छत्तीसगडमधील सत्यम त्रिपाठी नावाच्या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.

३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील इंदिरापुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील सारा गोल्ड सोसायटीमध्ये राहणाऱ्या छत्तीसगडमधील सत्यम त्रिपाठी नावाच्या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सत्यम हा त्याचा मित्र आणि एका ब्रोकरसोबत मिळून फ्लॅट पाहण्यासाठी गेला होता. सत्यम याचा ३१ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्याच्या चपला २४ व्या मजल्यावर सापडल्याने संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी सत्यम याचा अपघाती मृत्यू झाल्याचे मानण्यास नकार दिला आहे. तसेच सत्यम याचा मित्र कार्तिक सिंह आणि ब्रोकरवर हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
ही घटना रविवारी संध्याकाळी घडल्याची माहिती समोर आली आहे. इंदिरापुरम पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सत्यम त्रिपाठी हा छत्तीसगडमधील रहिवासी होता. तसेच एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होता. तो रविवारी संध्याकाळी सोसायटीमध्ये फ्लॅट पाहण्यासाठी त्याचा मित्र कार्तिक सिंह आणि एका स्थानिक ब्रोकरसोबत आला होता. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार फ्लॅट पाहत असताना ही दुर्घटना घडली.
मात्र, सत्यम याच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सत्यम याचा ३१ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्याच्या चपला आणि मोबाईल हा २४ व्या मजल्यावर सापडल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेबाबत संशय निर्माण झाला आहे. सत्यम हा घरातील एकुलता एक मुलगा होता. तसेच तो कुठल्याही मानसिक तणावामध्ये नव्हता. त्यामुळे तो जीवन संपवण्याची कुठलीही शक्यता नाही, असे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. तसेच सत्यम याचा मित्र कार्तिक सिंह आणि ब्रोकरवर संशय व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.