पाकिस्तान ज्याला थरथर कापत होते ते 'मिग-२१' थांबले; शाही थाटात निरोप, मनात आठवणी दाटल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 11:00 IST2025-09-27T11:00:15+5:302025-09-27T11:00:38+5:30
मिग-२१च्या निरोप समारंभप्रसंगी भारतीय हवाई दलाच्या ‘आकाश गंगा’ या स्कायडायव्हिंग टीमने ८,००० फूट उंचीवरून थरारक झेप घेतली.

पाकिस्तान ज्याला थरथर कापत होते ते 'मिग-२१' थांबले; शाही थाटात निरोप, मनात आठवणी दाटल्या
चंदीगड : मागील सहा दशकांहून अधिक काळ भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) लढाऊ क्षमतेचा आधारस्तंभ राहिलेले ‘मिग-२१’ या विमानाने शुक्रवारी भारतीय आकाशातून अखेरचे उड्डाण केले.
ही विमाने हवाई दलाच्या ताफ्यातून निवृत्त करण्यात आली असून, चंडीगड येथे त्यांचा शाही थाटात निरोप समारंभ पार पडला. त्यावेळी या विमानाने आजवर बजाविलेल्या उत्तम कामगिरीच्या आठवणी अनेकांच्या मनात दाटून आल्या होत्या. मिग-२१ हे एक शक्तिशाली लढाऊ विमान, तसेच राष्ट्रीय अभिमानाचा विषय होता असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. १९६०च्या दशकात हे विमान भारतीय हवाई दलात सामील झाले होते. मिग-२१च्या निरोप समारंभप्रसंगी भारतीय हवाई दलाच्या ‘आकाश गंगा’ या स्कायडायव्हिंग टीमने ८,००० फूट उंचीवरून थरारक झेप घेतली.
अनेक युद्धांत नेत्रदीपक कामगिरी
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, मिग-२१चे योगदान केवळ एका युद्धापुरते मर्यादित नव्हते. १९७१चे पाकिस्तानविरोधातील युद्ध, १९९९चे कारगिल युद्ध आणि २०१९मधील बालाकोट एअर स्ट्राइक या सर्व मोहिमांमध्ये या विमानाने मोठी कामगिरी बजावली. मिग-२१ विमानाच्या निरोप समारंभाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वी मोहिम पार पाडलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, तसेच हवाई दलाचे अनेक वैमानिकही उपस्थित होते. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी मिग-२१ बायसन विमानातून शुक्रवारी उड्डाण केले.
‘उडती शवपेटिका म्हणणे अतिशय चुकीचे’
मिग-२१ विमानाला उडती शवपेटिका म्हणणे अतिशय चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय हवाई दलाच्या एका माजी वैमानिकाने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली. मिग-२१ विमानांना झालेल्या अपघातांमुळे ती विमाने हवाई दलाच्या ताफ्यांतून काढून टाका, अशी सातत्याने टीका होत होती. या विमानांनी युद्धांमध्ये जी उत्तम कामगिरी बजावली त्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे, असे या माजी वैमानिकाने सांगितले.
मिगचा इतिहास
११,५०० हून अधिक मिग-२१ विमाने तयार करण्यात आली.
८५० हून अधिक मिग-२१ विमानांचा भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात समावेश करण्यात आला होता.
१९५६ मध्ये मिग २१ ने सोव्हिएतच्या आकाशात पहिले उड्डाण केले.