"दिल्लीतील बैठकीने उत्साह वाढला; २०२४ साली महाराष्ट्रात निश्चित सत्तांतर"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 19:59 IST2023-07-06T19:58:22+5:302023-07-06T19:59:53+5:30
दिल्लीतील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

"दिल्लीतील बैठकीने उत्साह वाढला; २०२४ साली महाराष्ट्रात निश्चित सत्तांतर"
मुंबई - राज्याच्या राजकारणात अचानक मोठा क्लायमॅक्स पाहायला मिळाला. महायुती सरकार स्थीर असतानाही राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपने सरकारची ताकद वाढवली आहे. मात्र, राष्ट्रवादीचा या सरकारला पाठिंबा नसून आपणच पक्षाचा अध्यक्ष असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज दिल्लीत पक्षाची बैठक घेतली. या बैठकीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ९ मंत्री आणि सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एस आर कोहली यांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्याच आल्याची घोषणाही करण्यात आली. तसेच, आजच्या बैठकीमुळे उत्साह वाढल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
दिल्लीतील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ राज्य समित्यांपैकी एकाही समितीने आपण शरद पवार यांच्यासोबत नसल्याचे सांगितले नाही. संघटना अबाधित आहे, असे राष्ट्रवादीचे नेते पी.सी. चाको म्हणाले. त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. कुणी काही नियुक्त्या केल्या त्याला अर्थ नाही. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून पुढील कायदेशीर संस्थांकडे जाण्याची गरज लागणार नाही, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
मुझे खुशी है की आज नई दिल्ली में निवासस्थान पर हुई कार्यसमिति सदस्यों की बैठक में जिन लोगों को निलंबित किया गया है उन्हें छोडकर बाकी लोग उपस्थित थे। पार्टी को ठेस पहुंचाने का काम कुछ लोगों ने किया। पार्टी को फिर मजबुतीसे खड़ा करना,आगे लेके जाना,अच्छी स्थिती में लाने की मानसिकता…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 6, 2023
आजच्या बैठकीमुळे उत्साह वाढला असून ज्यांना निलंबित करण्यात आलं ते सोडून इतर सर्वच पक्षाचे नेते आज बैठकीला उपस्थित होते. पक्षाला ठेस पोहोचवण्याचं काम काहींनी केलं आहे. मात्र, पक्षाला पुन्हा मजबुतीने उभं करणं आणि पुढे घेऊन जाण्याची मानसिकत सर्वच उपस्थित माझ्या सहकाऱ्यांमध्ये पाहायला मिळाली, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच, मला पूर्ण विश्वास आहे की, २०२४ मध्ये महाराष्ट्रात सत्तापालट होणार, आज ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना लोक सत्तेपासून दूर करतील. विरोधी पक्षात काम करत असलेल्या लोकांविरुद्ध ज्या पद्धतीने पाऊलं उचलली आहेत. त्याची किंमत त्यांना भोगावीच लागेल, असे म्हणत शरद पवारांनी नाव न घेता सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं.
महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या हाती लोक सत्ता देतील, असेही शरद पवारांनी म्हटलं.