ऋषभ पंतचा जीव वाचवणारा रजत देतोय मृत्यूशी झुंज; प्रेयसीच्या मृत्यूनंतर आई वडिलांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:24 IST2025-02-12T15:59:33+5:302025-02-12T16:24:58+5:30
क्रिकेटपटू ऋषभ पंतचा जीव वाचवणाऱ्या एका तरुणाने प्रेयसीसह आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

ऋषभ पंतचा जीव वाचवणारा रजत देतोय मृत्यूशी झुंज; प्रेयसीच्या मृत्यूनंतर आई वडिलांचा गंभीर आरोप
Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत २०२२ मध्ये एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला बराच वेळ लागला. पण, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि जिद्दीच्या जोरावर पंत पुन्हा मैदानात परतला. अपघात घडला त्यावेळी दोन जणांनी ऋषभला गाडीबाहेर काढून त्याचा जीव वाचवला होता. यामध्ये रजत कुमार नावाचा तरुण देखील होता. मात्र आता ऋषभला वाचवणाऱ्या रजत कुमारबाबत अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. ऋषभ पंतचा जीव वाचवणाराच आज मृत्यूशी झुंज देत असून त्याच्या प्रेयसीचा मृत्यू झाला आहे.
कार अपघातात क्रिकेटपटू ऋषभ पंतचा जीव वाचवणाऱ्या रजत कुमारने मंगळवारी आपल्या प्रेयसीसह आत्महत्येचा प्रयत्न केला. २५ वर्षीय रजतची प्रकृती चिंताजनक असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. तर त्याच्या प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पुरकाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुच्छा बस्ती गावात हा सगळा प्रकार घडला.
रजत आणि त्याची प्रेयसी गेल्या ५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोघेही वेगवेगळ्या समाजाचे असल्याने त्यांच्या नात्याला घरच्यांचा विरोध होता. दोघेही तासनतास फोनवर बोलत असत. पण ते वेगवेगळ्या समाजाचे असल्याने कुटुंबीयांना त्यांचे नाते मान्य नव्हतं. त्यामुळे मुलीचे कुटुंबिय तिचे दुसरीकडे कुठेतरी लग्न लावणार होते. मुलीच्या घरच्यांनी तिला रजतला भेटण्यापासूनही रोखले होते. दुसरीकडे, रजतचे कुटुंबीयही त्यांच्या नात्याला विरोध करत होते. रजतचेही लग्न दुसऱ्या मुलीशी करण्याचा त्याचे कुटुंबिय विचार करत होते.
दोघांनी घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आलं नाही. त्यानंतर दोघांनी एकमेकांना भेटणे बंद केले. त्यानंतर दोघांनीही जीव देण्याचे ठरवलं आणि मंगळवारी टोकाचं पाऊल उचललं. दोघांनीही विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मुलीचा मृत्यू झाला तर रजतवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलीच्या आई वडिलांनी रजतवर हत्येचा आरोप लावला आहे. याप्रकरणाची पोलिसांनी नोंद करुन तपास सुरु केला आहे.
ऋषभ पंतचा वाचवला होता जीव
३० डिसेंबर २०२२ रोजी, रजत आणि निशू कुमार यांनी उत्तराखंडमधील रुरकीजवळ दिल्ली-डेहराडून महामार्गावर ऋषभ पंतला जळत्या वाहनातून बाहेर काढण्यास मदत केली होती. त्यानंतर पंतने रजत आणि निशू कुमार यांना प्रत्येकी एक स्कूटर भेट दिली होती.