दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:38 IST2025-11-07T12:37:50+5:302025-11-07T12:38:23+5:30
एक कपल चक्क महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरण्याचं काम करत होते. त्यांच्या चोरीचा फंडा इतका हटके होता की, चोरी होतेय हेच कुणाच्या लक्षात आले नाही.

AI Generated Image
आजवर चोरीची अनेक प्रकरणं तुम्ही ऐकली असतील. महागड्या वस्तू, मोबाईल, पैसे अशा गोष्टी चोरीला गेल्याचे अनेकदा कानावर पडले असेल. पण आता कानपूरमधून एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या भागात राहणारे एक कपल चक्क महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरण्याचं काम करत होते. त्यांच्या चोरीचा फंडा इतका हटके होता की, चोरी होतेय हेच कुणाच्या लक्षात आले नाही. मात्र, जेव्हा वाईन शॉपच्या स्टॉकमध्ये सतत काहीतरी कमी असल्याचे लक्षात आल्यावर, दुकानदाराला संशय आला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला.
सातत्याने दुकानातील महागड्या दारूच्या बाटल्या गायब होत असल्याचं लक्षात आल्यावर दुकानदाराने कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सांगितले. मागील एक महिन्यापासून दुकानातील महागड्या वाईनच्या बाटल्या अचानक गायब होत होत्या. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गेल्या एक महिन्यापासून एक जोडपं त्यांच्या दुकानात सतत येत आहे. हे जोडपं एक बॉटल खरेदी करतं आणि पुन्हा बाटल्यांच्या रॅक जवळ जाऊन घुटमळतं. ते तिथून बाजूला होताच एखादी बॉटल गायब झालेली दिसत होती.
चोरी केलीच पण 'असे' पकडले गेले!
सदर प्रकार दुकानदाराच्या लक्षात आल्यावर त्यानं पुढच्या वेळेस हे जोडपं दुकानात आलं की त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवा, असे कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर पुन्हा जेव्हा हे जोडपं दारूची बॉटल खरेदी करण्यासाठी या दुकानात आलं, तेव्हा त्यांच्यावर सीसीटीव्हीमधून लक्ष ठेवण्यात आलं होतं. नेहमीप्रमाणेच त्यांनी एक बॉटल विकत घेतली आणि नंतर रॅकजवळ घुटमळत राहिले. या दरम्यान जोडप्यातील तरुणीने रॅकमधील एक बॉटल उचलून आपल्या कपड्यांमध्ये लपवली, दुकानातील कर्मचाऱ्यांनी हे पाहिलं आणि बाहेर पडत असताना तरुणीला रोखलं. त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने आपल्या जवळची बॉटल तरुणाच्या हातात दिली आणि ती तिथून पसार झाली.
तरुणी झाली पसार
मात्र, दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी तरुणाला पकडल्यामुळे सदर चोरीचा प्रकार समोर आला. तरुणाची चौकशी करताच त्याने सांगितले की, गेल्या एक महिन्यापासून ते दोघेही दुकानातील महागड्या दारूच्या बाटल्या चोरत होते. या तरुणाचे नाव नबील असे असून, पळून गेलेली तरुणी त्याची गर्लफ्रेंड होती. तिचे नाव श्रेया आहे. सध्या श्रेया गायब असून पोलीस तिचा शोध घेत आहेत, तर नबील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.