बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:43 IST2025-11-19T16:26:06+5:302025-11-19T16:43:38+5:30
सौदी अरेबियाच्या नियमांनुसार धार्मिक यात्रेदरम्यान जर एखाद्या भाविकाचा मृत्यू झाला, तर त्याचा मृतदेह हा त्याच्या मायदेशी पाठवला जात नाही.

बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
सौदी अरेबियातील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचे अंत्यसंस्कार मक्का आणि मदिनाजवळ केले जाणार आहेत. सौदी अरेबियामध्ये आता मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू झाली आहे. सौदी सरकार सर्व मृतांवर अंत्यसंस्कार करेल. सौदी अरेबियाच्या नियमांनुसार धार्मिक यात्रेदरम्यान जर एखाद्या भाविकाचा मृत्यू झाला, तर त्याचा मृतदेह हा त्याच्या मायदेशी पाठवला जात नाही. आता बस अपघातातील मृतांवर देखील सौदीचे सरकार सोपस्कार करणार आहे. यासाठी भारतातून कुटुंबातील सदस्यांना सौदीला बोलावण्यात आले आहे. तेलंगणातील पस्तीस लोक आधीच सौदी अरेबियाला रवाना झाले आहेत. गुरुवारी सर्व मृतदेहांवर इस्लामिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातील.
तेलंगणा सरकारच्या विनंतीनुसार, सौदी अरेबिया सरकारने कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यास सहमती दर्शविली आहे. तेलंगणा सरकारने प्रत्येक कुटुंबातील दोन सदस्यांना सरकारी खर्चाने सौदीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हज समितीला हे करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तेलंगणा सरकारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहम्मद अझरुद्दीन स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. अझरुद्दीन स्वतः देखील दोन दिवसांपूर्वी सौदी अरेबियात पोहोचले आहेत.
मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू
अपघातानंतर, सौदी अधिकाऱ्यांनी मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली. काही मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे आणि मृत्यू प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. तथापि, काही मृतदेहांबद्दल माहिती अद्याप अज्ञात आहे. काही मृतदेह पूर्णपणे जळल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
सौदी सरकार या मृतदेहांची डीएनए चाचणी करणार असून, त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्रे दिली जातील. मृत्यू प्रमाणपत्रे दिल्यानंतरच सौदी अरेबियामध्ये अंत्यसंस्कार प्रक्रिया सुरू होते.
४५ लोकांचा झाला होता मृत्यू
सौदी अरेबियाला उमराह यात्रेसाठी गेलेल्या ४५ जणांचा बस अपघातात मृत्यू झाला. अहवालानुसार मक्का-मदीना कॉरिडॉरवरून प्रवास करत असताना बस एका तेल टँकरला धडकली आणि त्यामुळे स्फोट झाला. मृतांपैकी बहुतेक लोक हे तेलंगणाचे रहिवासी होते.