भारतीय संविधानाच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासासंदर्भात राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (मंगळवार) विरोधीपक्षांच्या प्रश्नांना उत्तर दिले. शाह म्हणाले, “संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेली चर्चा देशातील तरुणांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची आहे. यामुळे देशातील जनतेला, कोणत्या पक्षाने संविधानाचा सन्मान केला आणि कुणी नही, हे समजून घ्यायलाही मदत होईल. मी सरदार पटेलांचे आभार मानतो, कारण त्यांच्या संघर्षामुळेच आज आपला देश जगात भक्कमपणे उभा आहे.
भारतीय जनतेनं हुकूमशहांचा अहंकार मोडीत काढला -शाह म्हणाले, “गेल्या 75 वर्षांत अनेक देश स्वतंत्र झाले आणि त्यांनी नव्याने सुरुवात केली. मात्र तेथे लोकशाही यशस्वी ठरू शकली नाही. मात्र आपली लोकशाही खोलवर रुजलेली आहे. आपण रक्ताचा एक थेंबही न सांडता अनेक बदल केले आहेत. या देशातील लोकांनी अनेक हुकूमशहांचा अहंकार लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमाने मोडीत काढला आहे.”
भारतावर अनेक वर्षं राज्य करणारा ब्रिटनही आज मागे पडला -अमित शाह पुढे म्हणाले, “जे लोक म्हणत होते की, आपण आर्थिक दृष्ट्या बलशाही होऊ शकणार नाही, त्यांनाही आपल्या जनतेने आणि आपल्या संविधानाने सुंदर उत्तर दिले आहे. आज आपण जगातील 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनून सन्मानाने उभे आहोत. एवढेच नाही तर, भारतावर अनेक वर्षे राज्य करणारा ब्रिटनही अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आज आपल्या पेक्षा बराच मागे पडला आहे.”