तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 06:28 IST2025-12-27T06:28:00+5:302025-12-27T06:28:17+5:30
अनेक कंपन्या अगरबत्तीत कीटक मारण्यासाठी किंवा तीव्र सुगंधासाठी अलेथ्रिन, परमेथ्रिन, सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन आणि फिप्रोनिल यांसारख्या घातक कीटकनाशकांचा वापर करत होत्या.

तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठा अगरबत्ती उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या भारताने ग्राहकांच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अगरबत्तीच्या धुरावाटे शरीरात जाणारी विषारी रसायने रोखण्यासाठी भारतीय मानक ब्यूरोने नवीन ‘आयएस १९४१२:२०२५’ हे गुणवत्ता मानक जाहीर केले आहे. यामुळे आता अगरबत्ती निर्मितीत घातक कीटकनाशके आणि रसायनांच्या वापरावर पूर्णतः बंदी आहे.
अनेक कंपन्या अगरबत्तीत कीटक मारण्यासाठी किंवा तीव्र सुगंधासाठी अलेथ्रिन, परमेथ्रिन, सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन आणि फिप्रोनिल यांसारख्या घातक कीटकनाशकांचा वापर करत होत्या. या रसायनांचा धूर फुफ्फुसांसाठी घातक ठरत असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झाले आहे. अशा पदार्थांच्या वापरावर आता बंदी असेल.
आता नवीन मानकांचे पालन करणाऱ्या उत्पादनांवर ‘बिस स्टँडर्ड मार्क’ असणे बंधनकारक असेल. यामुळे ग्राहकांना सुरक्षित अगरबत्ती ओळखणे सोपे जाईल. या नियमांमुळे केवळ घरातील हवेची गुणवत्ता सुधारणार नाही, तर ८,००० कोटी रुपयांच्या भारतीय अगरबत्ती बाजाराला जागतिक स्तरावर नवीन विश्वासार्हता मिळेल.
तीन श्रेणींत विभागणी
नव्या मानकांनुसार अगरबत्तीचे मशीननिर्मित, हस्तनिर्मित आणि पारंपरिक मसाला अगरबत्ती अशा तीन श्रेणींत वर्गीकरण करण्यात आले आहे. यामुळे कच्चा माल आणि सुगंधाचा दर्जा राखणे सोपे होईल.
कर्नाटक 'अगरबत्ती हब'
कर्नाटकला भारताचे 'अगरबत्ती हब' मानले जाते. महाराष्ट्र व गुजरातमध्येही अनेक लघु आणि मध्यम उद्योग यात सक्रिय आहेत. १५०+ देशांना भारत वर्षाला १,२०० कोटी रुपयांची अगरबत्ती निर्यात करतो. नव्या मानकांमुळे ही निर्यात आणखी वाढेल.