इंडिया आघाडीची पहिलीच सभा रद्द! भोपाळमध्ये होणार होती, कमलनाथांनी स्पष्टच सांगितले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 17:46 IST2023-09-16T17:45:30+5:302023-09-16T17:46:07+5:30
भाजपाविरोधात विरोधकांनी आघाडीची नव्याने मोट बांधली आहे. जागावाटपावरून या आघाडीमध्ये धुसफुस होणार आहे.

इंडिया आघाडीची पहिलीच सभा रद्द! भोपाळमध्ये होणार होती, कमलनाथांनी स्पष्टच सांगितले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी तयार झालेल्या इंडिया आघाडीची पहिलीच सभा रद्द झाली आहे. ही रॅली मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये होणार होती. परंतू, आज कमलनाथ यांनीच ही रॅली रद्द झाल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
भाजपाविरोधात विरोधकांनी आघाडीची नव्याने मोट बांधली आहे. जागावाटपावरून या आघाडीमध्ये धुसफुस होणार आहे. काँग्रेसपासून वेगळे होऊन बनलेले प्रादेशिक पक्ष या आघाडीत अधिक आहेत. त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवायचे आहे. तर काँग्रेसला त्यांच्या पक्षाचे टिकवायचे आहे. यातच आप सारख्या काही पक्षांचे काँग्रेससोबतच वैर आहे.
अशातच इंडिया आघाडीची पहिल्या रॅलीचे भोपाळमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावर पत्रकारांनी कमलनाथ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सभा होणार नाहीय, रद्द झाली आहे, असे उत्तर दिले. तर मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर आमची चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. सद्या काही फायनल झालेले नाहीय, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंसोबत बैठक आहे, त्यानंतर रॅलीचे ठरवू असे ते म्हणाले.
#WATCH ...नहीं होने वाली...रद्द हो गई है: भोपाल में होने वाली INDIA गठबंधन की रैली को लेकर सवाल के जवाब में मध्य प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री और कांग्रेस नेता कमलनाथ pic.twitter.com/7vYQvs7Ol9
— ANI_HindiNews (@AHindinews) September 16, 2023
विरोधकांची समन्वय बैठक दिल्लीत पार पडली होती. पहिली रॅली भोपाळमध्ये होणार हे ठरले होते. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली होती. ही सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता ती रद्द करण्यात आल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. या मेळाव्याची तयारी करण्यास प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने केंद्रीय नेतृत्वाकडे असमर्थता दर्शवल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.