पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 17:06 IST2025-05-02T17:06:12+5:302025-05-02T17:06:33+5:30
Cyber Crime News: पहलगाम येथे झालेल्या दहतवादी हल्ल्यामुळे एकीकडे देशात दु:ख आणि संतापाची भावना आहे. तर दुसरीकडे अशा प्रसंगातही काही लोक फसवणुकीसारखी कृत्ये करत आहेत. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथून अशीच एक घटना समोर आली आहे.

पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ
पहलगाम येथे झालेल्या दहतवादी हल्ल्यामुळे एकीकडे देशात दु:ख आणि संतापाची भावना आहे. तर दुसरीकडे अशा प्रसंगातही काही लोक फसवणुकीसारखी कृत्ये करत आहेत. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे काही सायबर गुन्हेगारांनी एका पुजाऱ्याला लक्ष्य करत हजारो रुपयांचा गंडा घातला आहे.
कानपूरमधील पनकी येथे राहणाऱ्या एका पुजाऱ्याला एक फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण भारतीय लष्करात अधिकारी असल्याची बतावणी केली. तसेच लष्कराची एक तुकडी काश्मीरमध्ये जात असल्याने त्यासाठी एक पूजा करायची असल्याचे सांगितले. तसेच या पूजेची दक्षिणा देण्यासाठी तुमच्या बॅक खात्याची सविस्तर माहिती पाठवा, असेही सांगितले आणि पुजाऱ्याकडून त्याचा बँक अकाऊंट नंबर घेतला. तसेच या पुजाऱ्याच्या खात्यामधील पैशांवरच डल्ला मारला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कानपूरमधील पनकी येथे राहणारे पुजारी कृष्ण बिहारी शुक्ला हे पूजा आणि रुद्राभिषेक करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन आला होता. तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण कानपूर कँटमधून लष्कराचा अधिकारी बोलत आहे असे सांगितले. फोन करणाऱ्याने पुजाऱ्याला सांगितले की, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कानपूर कँट येथून लष्कराची एक तुकडी काश्मिरला जात आहे. त्यांच्यासाठी रुद्राभिषेक करायचा आहे.
त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून पुजाऱ्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याशीही बोलणं करून दिलं. तसेच पैसे देण्यासाठी बँकेचा खाते क्रमांक घेतला. मात्र नंतर सदर पुजाऱ्याच्या खात्यातून सगळी रक्कम गायब झाल्याचे निदर्शनास आले. अखेरीस आपली फसवणूक झाल्याचे पुजाऱ्याला समजले. त्यानंतर त्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.