जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:01 IST2025-09-23T17:59:46+5:302025-09-23T18:01:32+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका डॉक्टरने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी नर्सची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैवान झालेल्या या डॉक्टरने आधी या नर्सला नशेचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर तिला कारखाली चिरडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं
उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका डॉक्टरने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी नर्सची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैवान झालेल्या या डॉक्टरने आधी या नर्सला नशेचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर तिला कारखाली चिरडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गंभीररीत्या जखमी झालेल्या या नर्सचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला पकडून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. आरोपी डॉक्टरचं नाव शिवपाल कश्यप असं आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना १६ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. एक २२ वर्षीय तरुणी बिथरी चैनपूर बायपासजवळ नग्न आणि जखमी अवस्थेत सापडली होता. रुग्णालयात उपचारांदरम्यान तिने पोलिसांना पूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर गेल्या रविवारी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉ. शिवपाल हा विवाहित होता. त्यामुळे सदर नर्सला वाटेतून हटवण्यासाठी त्याने हा भयानक कट रचला होता.
मृत तरुणीने एएनएमचा कोर्स केला होता. त्यानंतर ती आरोपी डॉक्टरच्या रुग्णालयात नोकरी करू लागली होती. दरम्यान, आरोपी डॉक्टर आणि या नर्समध्ये मैत्री झाली. तसेच ही मैत्री प्रेमामध्ये बदलली. सदर डॉक्टर हा विवाहित होता. मात्र त्याने आपल्या कुटुंबाबाबतची माहिती या तरुणीपासून लपवून ठेवली होती. डॉक्टरच्या या संबंधांबाबत कुटुंबाला कळले तेव्हा घरात सतत भांडणं होऊ लागली. त्यातच सदर तरुणी डॉक्टरकडे लग्नासाठी हट्ट धरत होती.
दरम्यान, सदर तरुणी खूपच हट्ट करू लागल्यावर डॉक्टरने तिला कोर्ट मॅरेज करण्याचे आश्वासन दिले. तसेच या तरुणीच्या डोक्याला कुंकू लावला. त्यानंतर लग्नाची जबाबदारी टाळण्यासाठी या डॉक्टरने भयानक कट रचला. त्याने १६ सप्टेंबर रोजी पोटदुखीचा बहामा करून कारमध्ये बसवलं. त्यानंतर वाटेत त्याने या तरुणीला नशेची दोन इंजेक्शन दिली. त्यानंतर तिला कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचा मृत्यू झाल्याचं समजून घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान, जखमी अवस्थेत सापडलेल्या या तरुणीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारांदरम्यान, तिचा मृत्यू झाला होता.