पवित्र श्री सम्मेद शिखरजी परिसरात पर्यटनाला केंद्र सरकारची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2023 05:54 AM2023-01-06T05:54:43+5:302023-01-06T07:00:51+5:30

Shri Sammed Shikharji : श्री सम्मेद शिखरजीच्या मुद्द्यावरून देशभरात जैन समाजाने अतिशय तीव्र आंदोलन केले होते. त्याला अन्य धर्मीयांनीही भक्कम पाठिंबा दिला होता.

The central government has suspended tourism in the sacred Shri Sammed Shikharji area | पवित्र श्री सम्मेद शिखरजी परिसरात पर्यटनाला केंद्र सरकारची स्थगिती

पवित्र श्री सम्मेद शिखरजी परिसरात पर्यटनाला केंद्र सरकारची स्थगिती

googlenewsNext

नवी दिल्ली : झारखंडमधील पारसनाथ टेकडीवर असलेले जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी येथे इको-टुरिझमसंदर्भात सुरू असलेल्या सर्व हालचाली केंद्र सरकारने गुरुवारी एका आदेशाद्वारे स्थगित केल्या आहेत. यासंदर्भात तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने जारी केलेला आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गुरुवारी मागे घेतला.

तसेच या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी झारखंड सरकारने तातडीने पावले उचलावीत, असा आदेशही दिला. श्री सम्मेद शिखरजीच्या मुद्द्यावरून देशभरात जैन समाजाने अतिशय तीव्र आंदोलन केले होते. त्याला अन्य धर्मीयांनीही भक्कम पाठिंबा दिला होता. या आंदोलनाची केंद्र सरकारने दखल घेत हा  निर्णय घेतला. 

जुन्या आदेशांमध्ये महत्त्वाचे बदल
पारसनाथ येथील श्री सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र जिथे आहे, त्या पारसनाथ टेकडीच्या परिसरातील भागाला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित करण्याचा निर्णय केंद्राने तीन वर्षांपूर्वी घेतला होता. त्या निर्णयाची अधिसूचना २०१९ साली जारी करण्यात आली होती. आता श्री सम्मेद शिखरजीबाबत केंद्र सरकारने नवीन अधिसचूना जारी केली असून त्यात जुन्या आदेशांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. 

केंद्र सरकारने नेमली समिती
केंद्र सरकारने आता एक समिती नेमली असून ती श्री सम्मेद शिखरजी येथील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसराची नीट काळजी घेईल. या समितीमध्ये जैन समाजाचे दोन व स्थानिक जनजातीच्या समुदायांपैकी एका सदस्याचा समावेश असणार आहे. 

शिष्टमंडळाची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा
जैन समाजातील मान्यवरांच्या एका शिष्टमंडळाने या मुद्द्यावरून केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची गुरुवारी सकाळी भेट घेतली. श्री सम्मेद शिखरजीचे पावित्र्य जपण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे यादव यांनी शिष्टमंडळाला सांगितले. या चर्चेनंतर वेगवान घडामोडी घडून या तीर्थक्षेत्राच्या परिसरातील पर्यटनविषयक सर्व हालचाली थांबविण्यात आल्या. 

जैन समाजाने केले तीव्र आंदोलन
तीर्थस्थळ परिसरात पर्यटन विकासाच्या हालचालींमुळे या ठिकाणाचे पावित्र्य नष्ट होण्याचा धोका आहे, असा आक्षेप जैन समाजाने घेतला होता. या निर्णयाविरोधात जैन बांधवांनी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद येथे भव्य मोर्चे काढले होते. तसेच त्याआधीही दिल्ली व अन्य ठिकाणी मेळावे भरवून जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

दुकाने अर्धा दिवस बंद ठेवून आंदोलन
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटन विकसित करण्याच्या हालचालींना विरोध करण्यासाठी याआधी जैन बांधवांनी देशभर एक दिवस दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवली होती. तसेच विविध ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने सादर केली होती. जैन समाजाने देशभरात केलेल्या आंदोलनात सकल जैन समाजाचे अध्यक्ष व लोकमत मीडिया ग्रुपच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांचाही अतिशय महत्वाचा सहभाग आहे.  

केंद्रीय पर्यटनमंत्र्यांनी दिले होते आश्वासन
जैन समाजाच्या एक शिष्टमंडळाने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन आपल्या मागणीबाबतचे निवेदन दिले होते. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यावेळी श्री सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दर्जा देणार नाही, असे आश्वासन जी. किशन रेड्डी यांनी शिष्टमंडळाला दिले होते. 

या गोष्टींवर निर्बंध...
- दारू, अमली पदार्थांसारख्या पदार्थांच्या विक्रीला मनाई
- पाळीव प्राण्यांना या परिसरात कोणीही आणू नये
- मोठ्या आवाजात संगीत किंवा लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी नाही
- विनापरवानगी कोणीही ट्रेकिंग किंवा कॅम्पिंग करू शकत नाही
- मांसाहारी खाद्यपदार्थांच्या विक्रीला बंदी
- जलसाठे, वृक्षराजी, गुंफा, मंदिरे यांचे नुकसान होईल अशा गोष्टींना प्रतिबंध

धार्मिक भावनांचा आदर राखणे आवश्यक
जैन धर्मीयांचे सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी येथील परिसरात पर्यटनाचा विकास करण्यासाठी सुरू असलेल्या सर्व हालचाली थांबविण्याचा अत्यंत स्वागतार्ह निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पर्यटन विकासाला कोणीही विरोध करणार नाही. पण ते करताना कोणत्याही समुदायाची श्रद्धा, धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. श्री सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याने त्या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले असते. मात्र, केंद्र सरकारने जैन समाजाच्या भावनांचा आदर करून या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य कायम राहील, अशी पावले उचलली आहेत. हाच निर्णय याआधी झाला असता तर अधिक चांगले झाले असते. या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य कायम राखण्याकरिता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही जी पावले उचलली त्याबद्दल जैन बांधव त्यांचे आभारी आहेत.
- विजय दर्डा, सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व 
लोकमत मीडिया ग्रुपच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन

Web Title: The central government has suspended tourism in the sacred Shri Sammed Shikharji area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.