"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:31 IST2025-11-15T12:30:26+5:302025-11-15T12:31:20+5:30
डीजीपींनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे...

"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
जम्मू-काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा, जप्त केलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्याचा स्फोट झाला. यात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस महासंचालक (DGP) नलिन प्रभात यांनी आज पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. "एफएसएल टीम सँपल घेत असताना झालेला हा स्फोट, कुठल्याही प्रकारचा दहशतवादी कट नसून केवळ एक अपघात होता," असे नलिन प्रभात यांनी म्हटले आहे.
डीजीपी नलिन प्रभात म्हणाले, "फरीदाबाद येथून जप्त केलेल्या स्फोटक सामग्रीचे नमुने (सँपलिंग) घेण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते. अत्यंत संवेदनशील असलेली ही स्फोटके आणि रासायनिक सामग्रीची तपासणी दोन दिवसांपासून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या टीमकडून केली जात होती. याच दरम्यान, काल रात्री 11:20 वाजता हा स्फोट झाला. या स्फोटाची सखोल चौकशीचे केली जात आहे.
'दहशतवादी कटाचा अथवा हल्ल्याचा कुठलाही अंगल नाही' -
या घटनेत कुठल्याही प्रकारचा दहशतवादी कट अथवा हस्तक्षेपाचा अँगल नाही. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 32 जण जखमी झाले आहेत. सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे, यामुळे मृत आणि जखमींची संख्या वाढू शकते.
मृतांमध्ये यांचा समावेश -
या अपघातात प्राण गमावलेल्या 9 जणांमध्ये 1 एसआयए अधिकारी, 3 एफएसएल सदस्य, 2 क्राइम विंग कर्मचारी, 2 महसूल अधिकारी आणि टीमला मदत करणारा एक स्थानिक शिंपी यांचा समावेश आहे. तसेच, जखमी झालेल्या 32 जणांमध्ये 27 पोलीस कर्मचारी, 2 महसूल अधिकारी आणि 3 नागरिकांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला. स्फोटानंतर पोलीस ठाण्यात मोठी आग लागली आणि इमारतीचेही मोठे नुकसान झाले. डीजीपींनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.