"ती नोटीस भाजी कापायचा नव्हे, तर गंज लागलेला चाकू होता"; जगदीप धनखड यांचे विरोधकांना खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 19:32 IST2024-12-24T19:30:32+5:302024-12-24T19:32:18+5:30
विरोधकांनी दिलेल्या अविश्वास ठरावाच्या नोटीसवर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.

"ती नोटीस भाजी कापायचा नव्हे, तर गंज लागलेला चाकू होता"; जगदीप धनखड यांचे विरोधकांना खडेबोल
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती. या नोटीसवर जगदीप धनखड यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विरोधकांवर निशाणा साधला. बायपास सर्जरीसाठी कधीही भाजी कापायचा चाकू वापरायचा नाही, असा अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.
महिला पत्रकारांशी बोलताना उपराष्ट्रपती धनखड यांनी या अविश्वास प्रस्ताव नोटीस भूमिका मांडली. धनखड यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या विधानाचा उल्लेख करत उत्तर दिले.
जगदीप धनखड काय बोलले?
उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, "उपराष्ट्रपतीच्या विरोधात नोटीस बघा... तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. चंद्रशेखरजींनी, एकदा म्हटलं होतं की, बायपास सर्जरी करण्यासाठी कधीही भाजी कापायचा चाकू वापरायचा नाही. ती नोटीस भाजी कापण्याचा चाकूही नव्हता. तो तर गंज लागलेला चाकू होता. अतिघाई होती. मी जेव्हा ते वाचले, तेव्हा मला धक्काच बसला."
याच मुद्द्यावर पुढे बोलताना जगदीप धनखड म्हणाले, "बरं झालं तुम्ही कोणी ते वाचलं नाही. तुम्ही जर ते वाचलं असतं, तर तुम्हाला अनेक दिवस झोपच आली नसती."
"जर अभिव्यक्ती स्वातंत्र मर्यादित आहे. तडजोड झाली आहे वा जबरदस्ती केली जात असेल, तर ही लोकशाही मूल्यातील उणीव आहे आणि हे लोकशाहीच्या विकासाच्या विरोधात आहे. लोकशाहीच्या यशासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या म्हणजे अभिव्यक्ती आणि संवाद", असे मत उपराष्ट्रपती धनखड यांनी मांडले.
पक्षपातीपणा करत असल्याचा विरोधकांनी केला होता आरोप
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, विरोधकांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. याच मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव नोटीस दिली होती. १० डिसेंबर २०२४ रोजी ही नोटीस देण्यात आली होती.
यावर विरोधी बाकावरील ६० खासदारांच्या सह्या होत्या. राज्यसभेचे सचिव पीसी मोदी यांच्याकडे ही नोटीस देण्यात आली होती. धनखड यांचे नावे चुकीचे लिहिण्यात आले आहे आणि १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होत नसल्याच्या कारणावरून ही नोटीस फेटाळून लावण्यात आली होती.