पोलिसांच्या पथकावर गोळबार करुन दहशतवादी फरार, एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 21:59 IST2021-11-14T21:59:17+5:302021-11-14T21:59:23+5:30
या घटनेनंतर पोलिस आणि CRPFच्या पथकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू केली आहे.

पोलिसांच्या पथकावर गोळबार करुन दहशतवादी फरार, एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी
श्रीनगर-जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या शोधत गेलेल्या पोलिसांच्या एका पथकावर दहशतवाद्यांकडून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. येथील जामलाता एरियामध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या या घटनेत एक पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गोळीबारात सहभागी असलेला दहशतवादी फरार झाला असून, पोलिस आणि CRPF त्याचा शोध घेत आहेत.
रेडसाठी गेले होते पोलिसांचे पथक
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओल्ड श्रीनगरच्या नावा कदल येथील जामलाता परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक शोध मोहिमेवर गेले, यादरम्यान सायंकाळी दहशतवाद्याकडून गोळीबार सुरू झाला. अचानक झालेल्या या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला, तर गोळ्या झाडणारा दहशतवादी फरार झाला. सध्या त्याचा शोध सुरू आहे.
अनेक घरांची झाडाझडती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारादरम्यान सायंकाळी असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. या गोळीबारानंतर पोलिसांनी CRPF च्या पथकांसोबत मिळून अनेक घरांची झाडाझडती घेतली. तसेच, परिसरात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.