दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:12 IST2025-11-04T19:11:40+5:302025-11-04T19:12:49+5:30
इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री गिदोन सार यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावले.

दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
India-Israel: इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री गिदोन सार यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान आज भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरणे तयार करणे, तसेच व्यापार, पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा झाली. सार यांनी यावेळी पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करताना केला.
पहलगाम हल्ल्याबाबत म्हणाले...
गिदोन सार म्हणाले, “इस्त्रायल हा प्रदेशातील एक प्रभावी लोकशाही देश आहे, तर भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र आणि सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आमचे उद्दिष्ट दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन रणनीतिक भागीदारी निर्माण करणे आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान इस्त्रायलने भारताला खुलेपणाने समर्थन दिले होते. दोन्ही देश दहशतवादाने पीडित आहेत आणि त्यामुळे दहशतवादाविरुद्ध आमची समान भूमिका अधिक मजबूत झाली आहे."
Opening remarks at my meeting with FM @gidonsaar of Israel in New Delhi.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 4, 2025
🇮🇳 🇮🇱
https://t.co/BxQwgOggsz
गाझा आणि हमासबाबत कठोर भूमिका
गिदोन सार यांनी सांगितले की, “इस्त्रायलला आज दहशतवादी राष्ट्रांशी सामना करावा लागत आहे. गाझामध्ये हमास, लेबनॉनमध्ये हिझबुल्ला आणि येमेनमध्ये हूथी यांसारख्या कट्टर दहशतवादी संघटनांनी मागील दशकात आपली मुळे घट्ट केली आहेत. या संघटनांना संपवणे हा आमच्या प्रदेशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे. हमासचे निशस्त्रीकरण आणि गाझा आमच्या धोरणाचे केंद्रबिंदू आहे. यात कोणताही तडजोड होणार नाही.”
दहशतवादाविरोधी धोरणात भारत-इस्त्रायल एकमत
डॉ. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, “भारत आणि इस्त्रायल हे दोन्ही दहशतवादाच्या विशेष आव्हानांचा सामना करत आहेत. आम्ही नेहमीच कठीण काळात एकत्र उभे राहिलो आहोत आणि आमचे संबंध परस्पर विश्वासावर आधारित आहेत. तसेच, भारत गाझा शांतता योजनेतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आम्ही बंधकांच्या सुटकेचे आणि मृतांच्या अवशेषांच्या परतीचे स्वागत करतो. भारताला आशा आहे की, ही योजना या प्रदेशात स्थायी शांततेचा मार्ग सुकर करेल,” असेही जयशंकर म्हणाले.
भारत-पश्चिम आशिया-युरोप आर्थिक कॉरिडॉरवर चर्चा
पीटीआयच्या माहितीनुसार, या बैठकीत IMEC (India-Middle East-Europe Corridor) विषयावर सविस्तर चर्चा झाली. या कॉरिडॉरद्वारे प्रादेशिक व्यापार, ऊर्जा सहकार्य आणि पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्याच्या संधी दोन्ही देशांनी तपासल्या.