हल्ल्यात दोन भाऊ जखमी, पण तो आतंकवाद्यांशी एकटाच भिडला! त्याचा रौद्रावतार पाहून दहशतवाद्यांनी पळ काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 15:31 IST2023-01-03T15:30:53+5:302023-01-03T15:31:27+5:30
Terror Attack: तीन घरांमध्ये मृत्यूचं तांडव खेळल्यानंतर दहशतवाद्यांनी चौथ्या घरावर मोर्चा वळवला. मात्र तिथून एक बहादूर युवक बाहेर आला. त्याने दहशतवाद्यांवर गोळीबार केला. प्रत्युत्तर झालेल्या गोळीबारामुळे दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला.

हल्ल्यात दोन भाऊ जखमी, पण तो आतंकवाद्यांशी एकटाच भिडला! त्याचा रौद्रावतार पाहून दहशतवाद्यांनी पळ काढला
जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये रविवारी आणि सोमवारी दोन मोठे दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये सहा हिंदूंचा मृत्यू झाला. तर १० पेक्षा अधिक जण जखमी झाले. दोन दहशतवाद्यांनी रविवारी संध्याकाळी तीन घरांवर गोळीबार केला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. तीन घरांमध्ये मृत्यूचं तांडव खेळल्यानंतर दहशतवाद्यांनी चौथ्या घरावर मोर्चा वळवला. मात्र तिथून एक बहादूर युवक बाहेर आला. त्याने दहशतवाद्यांवर गोळीबार केला. प्रत्युत्तर झालेल्या गोळीबारामुळे दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार दोन दहशतवादी रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास धांगरी गावात दाखल झाले. हे दहशतवादी सर्वात आधी प्रीतम यांच्या घरी गेले. त्यांनी त्याचे आधारकार्ड मागितले. आधारकार्ड पाहून दहशतवाद्यांनी ते हिंदू असल्याचीा खातरजमा केली. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. त्या हल्ल्यात दोन भाऊ जखमी झाले. त्यातील एकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर हे दहशतवादी २०० मीटर दूर असलेल्या दुसऱ्या घराकडे गेले. तिथे त्यांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर दहशतवाद्यांनी तिसऱ्या घरावर गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले.
हे दहशतवादी चौथ्या घराकडे वळत होते. तेव्हाच अचानक बाळकृष्ण नावाचा तरुण घराबाहेर आला. त्याच्या हातात व्हिलेज डिफेन्स कमिटीच्या सदस्याची बंदूक होती. त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला. त्यामुळे दहशतवादी पळून गेले. माजी आमदरा विबूद गुप्ता यांनी सांगितले की, जेव्हा बाळकृष्ण याने गोळीबार केल्याने दहशतवादी पळाले. हा गोळीबार सुरक्षा दलांनी केला असावा, असे दहशतवाद्यांना वाटले.