राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 09:03 IST2025-12-20T09:02:33+5:302025-12-20T09:03:37+5:30
Assam Train Accident: आसाममध्ये रेल्वे रुळ ओलांडत असलेल्या हत्तीच्या कळपाला वेगात असलेल्या राजधानी एक्स्प्रेसची धडक बसली. यात अनेक हत्तींचा मृत्यू झाला आहे. रेल्वे इंजिनसह अनेक डब्बे रुळावरून घसरले.

राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
आसाममध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला. डीएन सैरांग-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने रेल्वे रुळ ओलांडत असलेल्या हत्तींच्या कळपाला धडकली. हा अपघातात इतका भयानक होता की, रेल्वेचे इंजिन आणि पाच डब्बे रुळावरून घसरले. रेल्वेच्या धडकेत सात हत्तींचा मृत्यू झाला असून, रेल्वेतील प्रवाशी सुदैवाने सुखरूप राहिले.
लुमडिंग रेल्वे विभाग हद्दीत हा अपघात घडला. जिथे अपघात घडला ते ठिकाण गुवाहाटीपासून १२६ किमी दूर आहे. माहिती मिळताच रेल्वेची मदत व बचाव कार्य पथक तातडीने रवाना झाले.
स्थानिक लोकांनी सांगितले की, ८ हत्तींचा कळप होता. यातील बहुतांश हत्ती अपघातात मरण पावले. हत्तीचा कळप अचानक दिसला. तो बघून लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक दाबला पण तरीही हा अपघात घडलाच.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेचे पाच डब्बे आणि इंजिन रुळावरून उतरल्यामुळे, तसेच हत्तींचे मृतदेह रुळावरच पडलेले असल्यामुळे आसाम आणि पूर्वेकडील राज्यात जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या तुर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
त्या प्रवाशांना दुसऱ्या डब्ब्यांमध्ये जागा
एक्स्प्रेसचे पाच डब्बे घसरले. त्यामुळे या डब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्ब्यांमध्ये जागा करून देण्यात आली आहे. जे डब्बे रुळावरून घसरले आहेत, ते वेगळे करण्यात आले आहेत. युद्धपातळीवर काम केल्यानंतर हत्तींचे मृतदेह आणि डब्बे रुळावरून हटवण्यात आले आणि त्यानंतर रेल्वे गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाली.