कुंभ मेळ्यात एकाच दिवशी दहा कोटी भाविक? कुंभात मौनी अमावास्येला ‘अमृतस्नाना’चा मुहूर्त साधणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 06:41 IST2025-01-25T06:40:44+5:302025-01-25T06:41:13+5:30
Mahakumbh 2025: येत्या बुधवारी (दि. २९) मौनी अमावास्या असून, त्यावेळी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर १० कोटी लोक ‘अमृतस्नान’ करण्यासाठी येतील, असा उत्तर प्रदेश सरकारचा अंदाज आहे.

कुंभ मेळ्यात एकाच दिवशी दहा कोटी भाविक? कुंभात मौनी अमावास्येला ‘अमृतस्नाना’चा मुहूर्त साधणार
महाकुंभ नगर - येत्या बुधवारी (दि. २९) मौनी अमावास्या असून, त्यावेळी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर १० कोटी लोक ‘अमृतस्नान’ करण्यासाठी येतील, असा उत्तर प्रदेश सरकारचा अंदाज आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था तसेच गर्दीचे व्यवस्थापन नेटकेपणाने करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
मौनी अमावास्या असलेला २९ जानेवारीचा दिवस हा कुंभमेळ्यातील अमृतस्नानासाठी निश्चित केलेला तिसरा दिवस आहे. अमृतस्नानासाठी ३ फेब्रुवारी (वसंत पंचमी), १२ फेब्रुवारी (माघी पौर्णिमा) आणि २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री) हे दिवसही निश्चित करण्यात आले आहेत.या मेळ्यातील मौनी अमावास्या असलेला २९ जानेवारीचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. (वृत्तसंस्था)
महाकुंभमेळ्यासाठी गुजरातचे विशेष पॅकेज
- महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी गुजरात सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले. त्यानुसार अहमदाबादमधील राणीप बस डेपोतून दर दिवशी सकाळी ७ वाजता एसी व्होल्व्हो बस प्रयागराजसाठी रवाना होईल, असे गुजरातचे परिवहनमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले.
- अहमदाबाद आणि प्रयागराज यांतील अंतर सुमारे १,२०० किमी आहे. त्यामुळे बस मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे एका रात्रीसाठी थांबणार आहे. शिवपुरीतील मुक्कामदेखील पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. महाकुंभ मेळ्याला जाण्याचे हे पॅकेज ३ रात्री, ४ दिवसांचे असून, त्यासाठी प्रत्येकी ८,१०० रुपये इतके शुल्क आकारले जाईल.
२५१ किलोचे सोन्याचे सिंहासन चर्चेचा विषय
महाकुंभ मेळ्यात महामंडलेश्वर अरुण गिरी यांचे सिंहासन २५१ किलो सोन्यापासून बनविले आहे. ते आवाहन आखाडाचे पीठाधीश्वर आहेत. त्या सिंहासनावर सुबक नक्षीकाम केले आहे. ते पाहून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. महाकुंभ परिसरातील सेक्टर-११मध्ये हे सिंहासन ठेवण्यात आले आहे. त्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
गंगेचे प्रदूषण टाळण्यासाठी सरकारच्या उपाययोजना
गंगा नदीमध्ये प्रदूषणाची पातळी वाढू नये म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. नदीच्या पाण्याच्या रोज चाचण्या करण्यात येतात.
भाविकांनी आणलेली फुले, पूजा सामग्री वेगवेगळी केली जाते. कोणालाही निर्माल्य नदीत टाकण्यास परवानगी नाही. या मेळ्यात सांडपाणी तसेच मलमूत्राच्या निचऱ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.