मंदिराची जमीन हडपण्यासाठी देव मरण पावल्याची केली नोंद, उत्तर प्रदेशातील अजब घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:36 IST2021-02-18T03:47:31+5:302021-02-18T06:36:49+5:30
Temple Land Grabbed by Declaring God ‘Dead’ : या राज्यातील मोहनलालगंज परिसरातील कुशमौरा हलुवापूर या गावामध्ये हा अजब प्रकार घडला आहे. हे मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने आहे.

मंदिराची जमीन हडपण्यासाठी देव मरण पावल्याची केली नोंद, उत्तर प्रदेशातील अजब घटना
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील एका गावामध्ये कृष्ण व राम यांच्या एकत्रित मंदिराची जमीन हडपण्यासाठी या देवताच मरण पावल्याचे फेरफार केलेल्या कागदपत्रांत दाखविले. हा प्रकार उजेडात येताच खळबळ उडाली आहे.
या राज्यातील मोहनलालगंज परिसरातील कुशमौरा हलुवापूर या गावामध्ये हा अजब प्रकार घडला आहे. हे मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने आहे. या मंदिराची मालकीची ७३०० चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन आहे. हे मंदिर कृष्ण-राम ट्रस्टतर्फे चालविण्यात येत असल्याचे व राम-कृष्ण या देवतांचे वडील म्हणून गयाप्रसाद या व्यक्तीचे नाव कागदपत्रांत नमूद करण्यात आले होते.
१९८७ साली या मंदिराच्या मालकीच्या जमिनीच्या कागदपत्रांत काही फेरफार करण्यात आले. त्यानुसार कृष्ण-राम या देवता मरण पावल्याचे दाखवून ट्रस्टची ही सारी जमीन गयाप्रसाद यांच्या नावावर करण्यात आली होती. १९९१ साली गयाप्रसाद मरण पावले. त्यानंतर कृष्ण-राम ट्रस्टची सारी सूत्रे त्यांचे भाऊ रामनाथ व हरिद्वार यांच्याकडे गेली.
आता हे स्पष्ट होत आहे की, जमिनीचे अनेक भाग करून फसवेगिरी केली गेली आहे. उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी म्हटले की, चौकशीतून हे उघड झाले की, कोणी तरी बनावट कागदपत्रे ज्याने ट्रस्टची मूळात नोंद केली त्याच्या नावाने केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शर्मा यांनी नुकतेच उप विभागीय दंडाधिकारी प्रफुल्ल त्रिपाठी यांना दिले आहेत.
२५ वर्षांनंतर प्रकरण उजेडात
कृष्ण-राम मंदिराचे मूळ विश्वस्त सुशीलकुमार त्रिपाठी यांनी २०१६ साली नायब तहसीलदारांकडे केलेल्या तक्रारीमुळे २५ वर्षांपूर्वीचे हे अजब प्रकरण आता उजेडात आले आहे. या प्रकरणाची कागदपत्रे चौकशीसाठी नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी व उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेही मागवून घेतली; पण त्यातून अद्याप काहीही निष्पन्न झाले नाही.