...म्हणून 'तो' आमदार रात्रभर चक्क स्मशानात झोपला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 11:52 IST2018-06-25T11:50:58+5:302018-06-25T11:52:14+5:30
आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाच्या एका आमदाराने कर्तव्यनिष्ठेचं दर्शन घडवून नागरिकांची वाहवा मिळवली आहे.

...म्हणून 'तो' आमदार रात्रभर चक्क स्मशानात झोपला!
हैदराबादः जनतेच्या हिताचं काम करणारे आमदार सापडणं हल्ली जरा कठीणच झालंय. प्रत्येकाची 'समीकरणं' वेगळी आहेत. पण, काही जण या मोहजालात न अडकता आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसतात. आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाच्या एका आमदाराने अशाच कर्तव्यनिष्ठेचं दर्शन घडवून नागरिकांची वाहवा मिळवली आहे.
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे आमदार निम्माला रामा नायडू यांनी एक रात्र स्मशानात घालवली. त्यामागचं कारण काहीसं मजेशीर आहे, पण त्यातून नायडूंची कर्तव्यदक्षता सहज लक्षात येते. त्यांच्या मतदारसंघात स्मशानाच्या नूतनीकरणाचं काम करायचं होतं. परंतु, स्मशानाबद्दलचे गैरसमज, अंधश्रद्धा यामुळे कुणी कंत्राटदारच मिळेना. कसाबसा एक कंत्राटदार तयार झाला, तर त्याचे कामगार काम करायला तयार होईनात. एका कामगाराने स्मशानात अर्धवट जळलेला मृतदेह पाहिल्यानं त्यांच्यात घबराट पसरली होती. त्यांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी नायडू यांनी अंथरुण-पांघरुण घेऊन थेट स्मशानाची वाट धरली. ते रात्रभर स्मशानातच झोपले.
अजून दोन-तीन दिवस मी स्मशनातच येऊन झोपणार आहे. त्यामुळे कामगारांच्या मनातील धाकधूक कमी होईल आणि ते जोमाने काम करू शकतील, असं निम्माला रामा नायडू यांनी सांगितलं. स्मशानात झोपताना त्रास झाला नाही का, या प्रश्नावर नायडू हसत-हसत म्हणाले की, आधी डासांनी खूप हैराण केलं. पण नंतर मी मच्छरदाणी लावली आणि निवांत झोपलो.
जनतेच्या सोयी-सुविधांसाठी आमदारानं दाखवलेल्या या धाडसाचं नागरिकांकडून कौतुक होतंय.