"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:21 IST2025-11-06T10:20:36+5:302025-11-06T10:21:54+5:30
BJP Konda Vishweshwar Reddy : एका अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. भाजपा खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी या घटनेवर वादग्रस्त विधान केलं आहे.

"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
तेलंगणातील चेवेल्ला येथे झालेल्या एका अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. भाजपा खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी या घटनेवर वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी दावा केला की, रस्ते चांगले असल्यास वाहनांचा वेग वाढतो, ज्यामुळे जास्त अपघात होतात. खराब रस्त्यावर वाहनांचा वेग कमी असतो, ती हळू चालवली जातात, ज्यामुळे कमी अपघात होतात.
हैदराबाद-बिजापूर महामार्गाच्या तेलंगणा भागात भूसंपादनात विलंब होत असल्याचा आरोप करत खासदारांनी या अपघातासाठी बीआरएस सरकारला जबाबदार धरलं. त्यांनी आठवण करून दिली की, जेव्हा ते पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा त्यांनी बीआरएस सरकारला रस्त्याची दुरुस्ती करण्याची विनंती केली होती, परंतु कोणतीही प्रगती झाली नाही. मात्र त्यांच्या विधानामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
सोमवारी तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला येथे एका खडी भरलेल्या ट्रकची राज्य परिवहन महामंडळाच्या बसशी धडक झाली, ज्यामुळे खडी बसवर पडली आणि अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या धडकेत बसचा पुढचा भाग, विशेषतः चालकाच्या बाजूचं गंभीर नुकसान झाले. या अपघातात १३ महिलांसह १९ जणांचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी झाले.
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आणि अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक सूचना दिल्या. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक (डीजीपी) यांना अपघातात जखमी झालेल्या सर्व जखमींना तात्काळ हैदराबादमधील रुग्णालयात हलविण्याचे निर्देश दिले आहेत.