तेलंगणातील सिगाची फार्मा स्फोटातील मृतांची संख्या वाढली; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना १ कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 20:55 IST2025-07-01T20:53:54+5:302025-07-01T20:55:40+5:30

तेलंगणात औषध प्रकल्पात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या वाढली आहे.

Telangana Pharma Plant Blast 36 dead so far in Sigachi Pharma blast | तेलंगणातील सिगाची फार्मा स्फोटातील मृतांची संख्या वाढली; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना १ कोटींची मदत

तेलंगणातील सिगाची फार्मा स्फोटातील मृतांची संख्या वाढली; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना १ कोटींची मदत

Telangana Pharma Plant Blast: तेलंगणातील सिगाची इंडस्ट्रीजच्या औषध प्रकल्पात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. ही घटना ३० जून रोजी तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पसुम्यलम औद्योगिक क्षेत्रात घडली. आतापर्यंत ढिगाऱ्यातून ३१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर रुग्णालयात उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट इतका जोरदार होता की तिथे काम करणारे कामगार सुमारे १०० मीटर अंतरावर उड्डून पडले. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये अशाच एका अपघातात किमान ६ जणांचा मृत्यू झाला. 

स्फोटानंतर ढिगारा काढताना, त्याखाली अनेक मृतदेह आढळले. ढिगाऱ्यातून ३१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बचाव कार्याचा शेवटचा टप्पा अजूनही सुरू असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या काही मंत्रिमंडळ सदस्यांसह मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. आरोग्य मंत्री सी दामोदर राजनरसिंहा यांनी रेव सांगितले की राज्य सरकारने सर्व आवश्यक संसाधने एकत्रित केली आहेत. राजनरसिंहा यांच्या मते, घटनेच्या वेळी कारखान्यात सुमारे ९० कामगार उपस्थित होते.

पश्मिलारम औद्योगिक वसाहतीतील सिगाची फार्मा कंपनीत झालेल्या स्फोटाच्या वेळी फॅक्टरीमध्ये सकाळी ९:२८ ते ९:३५च्या दरम्यान ही दुर्घटना झाली. त्यावेळी कंपनीत सुमारे १५० कामगार होते, त्यातील ९० जण स्फोट झालेल्या भागात होते. त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफच्या पथकांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. हा स्फोट रासायनिक अभिक्रियेमुळे झाल्याचा संशय आहे. तेलंगणा सरकारने नेमके कारण शोधण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती अपघाताची चौकशी करेल.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये आणि गंभीर जखमींना १० लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. याशिवाय, जखमींना ५ लाख रुपये आणि तात्काळ मदत म्हणून १ लाख रुपये दिले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये आर्थिक मदत दिली जाईल असे म्हटले आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत फक्त नऊ मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. उर्वरित मृतदेहांची डीएनए प्रोफाइलिंग आवश्यक आहे. बहुतेक मृत ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील होते. सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेडने अपघातानंतर त्यांच्या संगारेड्डी प्लांटमधील उत्पादन ९० दिवसांसाठी स्थगित केले आहे.

Web Title: Telangana Pharma Plant Blast 36 dead so far in Sigachi Pharma blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.