Telangana Bus Accident: आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 10:59 IST2025-11-03T10:58:43+5:302025-11-03T10:59:12+5:30
Telangana Bus Accident News: गेल्या काही दिवसांपासून देशात प्रवासी बस अपघातांची मालिका सुरू असून, यात शेकडो प्रवाशांचा बळी गेला आहे. दरम्यान, काल राजस्थानमध्ये भाविकांच्या बसला झालेल्या अपघाताची बातमी ताजी असतानाच आज सकाळी तेलंगाणामध्ये एक भीषण बस अपघात झाला आहे.

Telangana Bus Accident: आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून देशात प्रवासी बस अपघातांची मालिका सुरू असून, यात शेकडो प्रवाशांचा बळी गेला आहे. दरम्यान, काल राजस्थानमध्ये भाविकांच्या बसला झालेल्या अपघाताची बातमी ताजी असतानाच आज सकाळी तेलंगाणामध्ये एक भीषण बस अपघात झाला आहे. तेलंगाणातील रंगारेड्डी जिल्ह्यात हैदराबाद-विजापूर महामार्गावर एका भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने झालेल्या अपघतात २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे ७० प्रवासी होते. त्यात महिला, विद्यार्थी आणि ऑफिसला जाणाऱ्या लोकांचा समावेश होता.
हा अपघात चेवेलाजवळच्या मिर्झागुडा गावाजवळ झाला. तंदूर डेपोची बस हैदराबादला जात असताना समोरून खडी घेऊन जात असलेला ट्रक चालकाचं नियंत्रण सुटून थेट बसवर येऊन आदळला. ही धडत एवढी भीषण होती की त्यात बसच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. तसेच ट्रकमधील खडी बसवर ओतली जाऊन प्रवासी त्याखाली दबले. या अपघातानंतर घटनास्थळी जखमी प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकून स्थानिक लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. तीन जेसीबींच्या मदतीने बसवर कोसळलेला ढिग बाजूला करून जखमींना बाहेर काढण्यात आले.
या अपघातात बस आणि ट्रक अशा दोन्हींच्या चालकांचा मृत्यू झाला. तर मृत्युमुखी पडलेल्याा इतर प्रवाशांमध्ये महिला आणि एका १० महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. जखमींना उपचारांसाछी चेवेला सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. तर गंभीररीत्या जखमी झालेल्यांना अधिक उपचारांसाठी हैदराबादमधील विविध रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मुख्य सचिव रामकृष्णा राव आणि डीजीपी बी. शिवधर रेड्डी यांना त्वरित मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व जखमींना उपचारांसाठी हैदराबादमधील रुग्णालयात हलवण्याची सूचना दगिली आहे. तसेच मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.