Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 10:22 IST2025-11-04T10:21:50+5:302025-11-04T10:22:38+5:30
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी दावा केला की, यावेळी बिहारमधील जनता बदल घडवण्याच्या मूडमध्ये आहे आणि २० वर्षांपासून सत्तेत असलेल्या एनडीए सरकारला उलथवून टाकणार आहे.
तेजस्वी यादव म्हणाले की, सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांसाठी असलेल्या योजनेअंतर्गत मकर संक्रांती (१४ जानेवारी) पासून सर्व पात्र महिलांना ३०,००० रुपये एकत्र दिले जातील. महिला या योजनेमुळे खूप आनंदी आहेत आणि ही योजना सरकारची प्राथमिकता असेल असं म्हणत तेजस्वी यादव यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणाही केल्या
शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीव्यतिरिक्त (एमएसपी) भातावर प्रति क्विंटल ३०० आणि गव्हावर प्रति क्विंटल ४०० रुपये बोनस देण्याचं आश्वासन दिलं. याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज पुरवली जाईल आणि त्यांचे वीज बिल पूर्णपणे माफ केले जाईल. तेजस्वी यांनी जुनी पेन्शन योजना (ओपीएस) पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन दिलं.
जीविका दिदींना २,००० रुपये मदत देण्याचं आणि त्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं. त्यांनी पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची त्यांच्या घरांच्या ७० किलोमीटरच्या परिसरात ट्रान्सफर केली जाईल अशी घोषणाही केली. तेजस्वी यादव यांनी वारंवार सांगितलं की, जनतेला बदल हवा आहे आणि यावेळी महाआघाडीचे सरकार येईल.