'टाटा' भारताची शान; गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान, जमशेदजी टाटा ठरले 'जगात भारी' परोपकारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 07:05 PM2021-06-23T19:05:00+5:302021-06-23T19:19:08+5:30

Tata Group Founder Jamsetji Tata : जमशेदजी टाटा यांनी गेल्या 100 वर्षांत तब्बल 102 बिलियन डॉलर्सचं दान दिलं आहे. टाटा यांनी प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे.  

tata group founder jamsetji tata ranked worlds top philanthropist in 100 years | 'टाटा' भारताची शान; गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान, जमशेदजी टाटा ठरले 'जगात भारी' परोपकारी!

'टाटा' भारताची शान; गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान, जमशेदजी टाटा ठरले 'जगात भारी' परोपकारी!

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. या संकटात टाटा समूह देशाच्या मदतीसाठी पुन्हा एकदा धावून आला आहे. टाटा समूहाच्या कंपन्या काही रक्कम गोळा करत आहेत, ज्यातून हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण या गोष्टी सहजरित्या शक्य होतील. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुढाकाराने 'नो लिमिट' (अमर्यादित) मदतीची एक योजना आखली आहे. टाटा समूह या योजनेसाठी तब्बल 2000 कोटी रुपये खर्च करणार आहे. याच दरम्यान टाटा समुहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या 100 वर्षांत सर्वाधिक दान करून जमशेदजी टाटा 'जगात भारी' परोपकारी ठरले आहेत. 

गेल्या 100 वर्षांच्या दानशूर लोकांच्या यादीत टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) हे प्रथम स्थानी आहेत. हुरुन रिपोर्ट आणि एडेलगिव फाउंडेशनच्या वतीने दान करणाऱ्या ट़ॉप 50 लोकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. जमशेदजी टाटा यांनी गेल्या 100 वर्षांत तब्बल 102 बिलियन डॉलर्सचं दान दिलं आहे. टाटा यांनी प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे. टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी 1892 पासून दिलेल्या मोठ्या देणग्यांचा या रिपोर्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. दानशूर लोकांच्या यादीमध्ये टाटा यांनी बिल गेट्स, वॉरेन बफे यांना देखील मागे टाकले आहे. भारतातील मोठ्या दानशूर व्यक्तींमध्ये विप्रोचे अजीम प्रेमजी यांचाही समावेश आहे. 

अवघ्या टाटा समुहाला दानशूरपणाचा वसा देऊन गेले, अल्पायुषी सर रतन टाटा...

सर रतन टाटा यांना टाटा समुहाच्या समाजसेवेचे रतन म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते जमशेदजी टाटा यांचे धाकटे पूत्र आणि नवल टाटा यांचे वडील होत. म्हणजेच सध्याचे टाटा समुहाचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे आजोबा. अशा या समाजसेवेचे व्रत अंगी असलेल्या सर रतन टाटा यांना अल्पायुष्यच लाभले, मात्र त्यांनी तेवढ्या आयुष्यातही एवढी मोठी कामे केली आणि टाटा समुहासाठी मोठी संपत्ती सोडून गेले. जेव्हा महात्मा गांधींनी आफ्रिकेमध्ये वर्णवादाविरोधात आंदोलन केले तेव्हा त्या आंदोलनाला टाटा यांनी 1.25 लाख रुपयांची मदत केली होती. ते स्वातंत्र सैनिक व समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांचे मित्र होते. त्यांनी गोखले यांच्या कामांसाठीदेखील दहा वर्षे प्रत्येकी 10000 रुपयांची मदत दिली होती. 

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी 400 पाऊंडची मदत देत होते. या चेअरला आता 'सर रतन टाटा फाउंडेशन' चे नाव देण्यात आले आहे. 1913 ते 1917 मध्ये पाटलिपुत्र (पटना)मध्ये पहिली पुरातत्व खोदकाम होणार होते. यासाठी त्यांनी पैशांची मदत केली. या खोदकामात सम्राट 100 स्तंभांचा मौर्यकालीन दरबार सापडला होता. बॉम्बे नगर निगमद्वारे सुरु केलेल्या किंग जॉर्ज पंचम अँटी ट्यूबरक्युलॉसिस लीगसाठी दहावर्षांपर्यंत 10000 रुपये दान केले. अवघ्या टाटा समुहाला समाजसेवेचा वसा शिकविणाऱे थोर रतनजी हे अल्पायुषी ठरले. 5 सप्टेंबर 1918 मध्ये त्यांचे इंग्लंडमध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांची बहुतांश संपत्ती समाजोपयोगी कामासाठी दान देम्यात आली. यानंतर 1919 मध्ये 80 लाख रुपयांचा फंड देऊन सर रतन टाटा ट्रस्टची स्थापना करण्यात आली.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: tata group founder jamsetji tata ranked worlds top philanthropist in 100 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app