Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 11:43 IST2025-09-28T11:42:39+5:302025-09-28T11:43:47+5:30
Tamilnadu Stampede : रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ३८ जणांचा मृत्यू झाला आणि ९५ जण जखमी झाले.

Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता थलपती विजयने आयोजित केलेल्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ३८ जणांचा मृत्यू झाला आणि ९५ जण जखमी झाले. पत्रकार परिषदेत, तामिळनाडूचे पोलीस अधिकारी जी. वेंकटरमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजकांना १०,००० लोक येण्याची आशा होती, परंतु सुमारे २७,००० लोक आले. त्यांनी स्पष्ट केलं की, पक्षाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर घोषणा केली होती की, थलपती विजय दुपारी १२ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचणार होता, ज्यामुळे मोठी गर्दी झाली.
रिपोर्टनुसार, लोक सकाळी ११ वाजल्यापासूनच येऊ लागले, तर थलपती विजय संध्याकाळी ७:४० वाजता पोहोचला. कडक उन्हात लोकांकडे पुरेसे अन्न आणि पाण्याची कमतरता होती. त्यांनी स्पष्ट केलं की, दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत रॅलीसाठी परवानगी मागितली गेली होती. याच दरम्यान, कार्यक्रमस्थळावरील व्हिडिओंमध्ये हजारो लोक एका मोठ्या प्रचार वाहनाभोवती उभे असल्याचं दिसून आलं आहे, ज्यावर विजय भाषण देत असल्याचं दिसत आहे.
तामिळनाडू सरकारने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने विजय याच्या करूर रॅलीतील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत तामिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. तर चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी तात्काळ एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्याची घोषणा तामिळनाडू सरकारने केली आहे.
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
तामिळनाडूचे शिक्षण मंत्री अंबिल महेश पोय्यामोझी यांना देखील या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. रुग्णालयातील भयंकर परिस्थिती पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात झालेल्या चेंगराचेंगरीने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. अंबिल महेश पोय्यामोझी या दुःखद घटनेनंतर रुग्णालयात दाखल झाले. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे, लहान मुलांचे मृतदेह पाहून ते हादरले, ढसाढसा रडले.