Fuel Hike : मित्रांनी नवरदेवाला दिलं एवढं 'महागडं' गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 14:11 IST2018-09-17T13:57:38+5:302018-09-17T14:11:44+5:30
Fuel Hike : तामिळनाडूमध्ये एका लग्नसोहळ्यात मित्रांनी मिळून नवरदेवाला महागडे गिफ्ट द्यायचे म्हणून गिफ्ट म्हणून चक्क हे दिले...

Fuel Hike : मित्रांनी नवरदेवाला दिलं एवढं 'महागडं' गिफ्ट
तामिळनाडू : देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दररोज वाढणाऱ्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. या परिस्थितीत तुम्हाला कोणी पेट्रोल गिफ्ट म्हणून दिले तर... केवळ विचारानंच तुमचा आनंद गगना मावेनासा झालाय ना?...
पण तामिळनाडूमध्ये एका लग्नसोहळ्यात मित्रांनी मिळून नवरदेवाला महागडे गिफ्ट द्यायचे म्हणून चक्क पाच लिटर पेट्रोल दिले आहे.
(मला तर पेट्रोल-डिझेल मोफत मिळतं, महागाईची झळ बसतच नाही - रामदास आठवले)
तामिळनाडूतील वृत्तवाहिनी ‘पुथिया तलाईमुरई’नं दिलेल्या वाहितीनुसार, एका लग्न समारंभात नवरदेवाच्या मित्रांनी पेट्रोलने भरलेला कॅन गिफ्ट केला आणि हे पाहून पाहुणेमंडळींना हसू आवरेच ना. दरम्यान, आज पुन्हा इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.तामिळनाडूमध्ये पेट्रोलचे प्रति लिटर दर 85.15 रुपये एवढे झाले आहेत.
(कर्नाटकमध्ये पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त)
दुसरीकडे, कर्नाटक सरकारने जनतेसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. राजस्थान, आंध्र प्रदेशनंतर आता कर्नाटकात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी दोन रुपयाने कपात केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त करत असल्याची घोषणा केली. काँग्रेसने भाजपावर इंधन दरवाढीवरून हल्ला चढवला आहे. 'आमच्या सरकारने राज्यात इंधनाचे दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आज मोदींचा वाढदिवस असल्याने त्यांच्यासाठी ही वाढदिवसाची भेट आहे', असा टोला लगावतानाच 'जर राज्य सरकार इंधन दर कमी करू शकते तर केंद्र सरकार इंधन दरात कपात का करत नाही?,' असा सवाल काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश राव यांनी केला.